केरळमधील जलप्रलयात ३२४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडे मदतीची याचना

भारतीय लष्कर आणि एनडीएफच्या जवानांकडून अहोरात्र मदतकार्य सुरु

Updated: Aug 18, 2018, 07:39 AM IST
केरळमधील जलप्रलयात ३२४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडे मदतीची याचना  title=

तिरुवनंतपुरम: मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भीषण पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या १०० वर्षांतील ही सर्वात भीषण परिस्थिती आहे. जवळपास ८० धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. यामध्ये आतापर्यंत ३२४ जणांचा बळी गेला आहे. तर दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत.  याआधी १९२४ साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती ओढावली होती. 
 
 या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले. ते शनिवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. यावेळी केरमधील आमदारांनी पंतप्रधानांकडे मदतीची याचना केली. 
 
 सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) आणि भारतीय सैन्यदलाच्या ७०० जवानांकडून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. ही सर्व पथके अद्ययावत सुविधांनी आणि उपकरणांनी सज्ज आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये ४,८०० लोकांना वाचवण्यात आले आहे. लोकांना वाचवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करु, अशी माहिती ब्रिगेडियर अरुण सीजी यांनी दिली. 
 
 याशिवाय, रेल्वेकडून केरळच्या दिशेने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रवाना करण्यात आल्या आहेत.  तामिळनाडूतून रेल्वेने २.८ लाख लिटर पाणी केरळकडे रवाना केले. 
 
 मदतकार्यात जास्तीत जास्त हेलिकॉप्टर लावण्याची विनंती राज्याने केंद्राला केली आहे. दिल्ली सरकारकडून केरळला १० कोटींची मदत घोषित केली जाण्याची शक्यता आहे. नौदलाने आयएनएस दीपक ही युद्धनौका मुंबईहून कोचीला रवाना केली आहे. यात पिण्याचे आठ लाख लिटर पाणी आहे. १९ ऑगस्टला आयएनएस दीपक कोचीला पोहोचेल.