नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारत सरकारकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने अनेक मजूरांना, गरिबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असणाऱ्यांना दररोजच्या जेवण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. अशातच दिल्लीतील प्रत्येत भागात, प्रत्येक गरजूला जेवण मिळावं यासाठी 'इस्कॉन फूड फॉर लाइफ'कडून दररोज 2 लाखांहून अधिक लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.
'इस्कॉन फूड फॉर लाइफ'चं किचन भारतातील सर्वात मोठं किचन आहे. येथे दररोज 2 लाखांहून अधिक लोकांसाठी जेवण बनवण्यात येतंय. इस्कॉनच्या किचनमध्ये एमसीडी, दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, सिव्हिल डिफेन्स आणि इस्कॉनचे जवळपास 1 हजार लोक मिळून काम करत आहेत.
जेवण बनवताना ऍन्टी कोरोना तत्व म्हणजे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, आलं यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येत आहे. इस्कॉनच्या किचनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेचं जेवण बनवलं जातं. जेवण बनवताना सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी 5 वेगवेगळ्या ठिकाणी जेवण बनवलं जात आहे.
जेवण सप्लाय अर्थात पुरवण्यासाठी 300 ई-रिक्शांचा उपयोग केला जात आहे. या सर्व रिक्शांमध्ये जीपीएस लावण्यात आला आहे. याद्वारे लोकेशनची माहिती मिळवण्यासाठी फायदा होत आहे.
इस्कॉन फूड फॉर लाइफचे प्रमुख पीयूष गोयल यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं की, सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी प्रत्येक सेंटरवर सरकारकडून 4 सरकारी अधिकारी दाखल आहेत. या अधिकाऱ्यांकडून जेवणाची गुणवत्ताही तपासली जाते. सरकारकडून हंगर हेल्प लाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांकडून कोणत्या भागात किती लोकांना जेवण पाठवायचं आहे, याबाबत माहिती मिळते.