Government Officer Dies Dancing: आयुष्य हे नश्वर आहे असं म्हणतात. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही यासंदर्भातील संवाद ऐकायला मिळतात. त्यातही आनंद चित्रपटामध्ये राजेश खन्ना यांच्या तोंडी असलेला, "हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है जिनकी डोर ऊपर वाले के हाथ में बंधी हैं. कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है" हा संवाद तर अजरामर आहे. हाच संवाद आठवावा असा प्रकार भोपाळमधील एका सरकारी अधिकाऱ्याबरोबर घडला. या अधिकाऱ्याचा नाचता नाचता मृत्यू झाला. सोशल मीडियावर या अधिकाऱ्याबरोबर नेमकं काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सर्व सरकारी कर्मचारी एका सहकाऱ्याच्या फेअरवेल पार्टीमध्ये नाचताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी असं काही घडतं की तेथील लोकांबरोबरच हा व्हिडीओ पाहणारेही हादरुन जातात. आयुष्य किती बिनभरोश्याचं आहे हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. नाचता नाचताच हा अधिकारी जमिनीवर पडतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा हे सर्व अधिकारी, 'बस आज की रात है जिंदगी' या गाण्यावर नाचत होते.
अधिकाऱ्यांच्या गर्दीमध्ये पिवळं शर्ट आणि काळ्या रंगाचं नेहरु जॅकेट घातलेला एक अधिकारी आपल्या मित्रांबरोबर नाचत होता. अचानक या अधिकाऱ्याची शुद्ध हरपते आणि तो जमीनीवर पडतो. त्यानंतर पुढील काही क्षणांमध्ये त्याचा मृत्यू होता. या अधिकाऱ्याला कार्डिअॅक अरेस्ट आल्याने त्याचा जागीच मृ्त्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
ट्विटरवर सुनिल वीर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे त्याचं वय 55 वर्ष इतकं आहे. या व्यक्तीचं नाव सुरेंद्र कुमार दीक्षित असं असून ते सहाय्यक निर्देशक पदावर कार्यरत होते. सुरेंद्र हे आपल्या मित्रांना नाचण्यासाठी बोलवत होते असंही त्यांच्या मित्रांनी सांगितलं. मात्र नाचता नाचताच आपला मृत्यू होईल अशी कल्पनाही सुरेंद्र यांनी केली नसेल. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
One Another #cardiacarrest Case, #Heartattack while dancing..
The officer died while dancing on the song 'Bas Aaj Ki Raat Hai Zindagi...' The case came to light from #MP's #Bhopal . pic.twitter.com/DczGaNzwzH— Sunil Veer (@sunilveer08) March 21, 2023
अशा प्रकारे नचता नाचता मृत्यू झाल्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अनेकदा एखाद्या सेलिब्रेशनमध्ये नाचताना लोकांचा मृत्यू झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मध्यंतरी एका 17 वर्षाच्या मुलाचा लग्नाच्या वरातीत नाचताना मृत्यू झाला होता.