मुंबई : मुंबई विशाखापट्टणम विमानात भारावून टाकणार प्रसंग घडलाय.
भारतीय नौदलातील आर्म्स या पाणबुडीला 50 वर्ष पूर्ण झालीय. त्यानिमित्त विशाखापट्टणम इथं सोहळा होता. त्यात सहभागी होण्यासाठी माजी जवान आणि अधिकारी विमानाने विशाखापट्टणमला जात होते.
विमानाने उड्डाण केल्यावर पायलटने एक उदघोषणा केली. आपल्यासोबत नौदलातील माजी जवान आणि अधिकारी असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. यामुळे प्रवाशी आश्चर्यचकीत झाले. त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारला. सर्वांनी उभं राहून जवानांसाठी टाळ्या वाजवल्या. प्रवाशांनी जवानांशी संवाद साधला. एरवी पडद्यामागे असणारे देशाचे खरे हिरो आपल्यासोबत असल्याचा सर्वांनाच प्रचंड आनंद झाला होता.
देशासाठी जवान करत असलेल्या त्यागाबद्दल प्रवाशांनी जवानांचे आभार मानले. जवानसुद्धा या अनपेक्षितपणे झालेल्या कौतुकाने हरखून गेले होते. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रेमाने ते गहिवरून गेले. आम्हालासुद्धा सर्वसामान्य माणसाशी संवाद साधण्याची संधी क्वचीतच मिळते, अशा भावना जवानांनी व्यक्त केल्या. त्यांनी सर्वांचे आभार मानले.जेव्हा जेव्हा आपणांसर्वांना संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपणसुद्धा सैनिकांचा सन्मान करत त्यांच्या कामासाठी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा उत्साह वाढवला पाहीजे.