गांधीनगर : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील विमानतळाच्या (Ahmedabad Airport) लाऊंजमध्ये ही भेट झाल्याचं समजतंय. या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka border dispute) चर्चा झाल्याचं समजतंय. (eknath shinde and basavaraj bommai both meets at ahmedabad airport on maharashtra karnataka border dispute gujrat cabinet expansion)
गुजरातमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीला केंद्रातील महत्त्वाचे मंत्री, आणि भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या शपथविधीनंतर अहमदाबाद विमानतळावर या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं ही चर्चा झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही मुख्यमंत्री भेटले. सीमावादाचा मु्द्दा गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. कानडिगांकडून महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र पु्न्हा आक्रमक झाला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर नक्की काय तोडगा निघतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
दरम्यान गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर आज 12 डिसेंबरला शपथविधी पार पडला. भुपेंद्रसिंह पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.