मुंबई : Edible Oil Price | सरकारकडून देशातील जनतेला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत कपात केल्यानंतर पुन्हा एकदा खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली आणण्यासाठी बुधवारी सरकारची महत्त्वाची बैठक अपेक्षित आहे. या बैठकीत तेल उत्पादकांसह निर्यातदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या बैठकीत सरकार तेल विक्रेत्यांना एमआरपी बदलण्याचे आदेश देईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाली आहे. अशा स्थितीत या कमतरतेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सरकारचा मानस आहे. आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. याआधीही खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता बंदी उठवल्यानंतर हे तेल बाजारात आल्यावर घसरण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनचे पीकही बाजारात येणार आहे. यामुळेही किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांत देशभरात शेंगदाणा तेल वगळता पॅकेज केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 15-20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यावेळी त्याची किंमत 150 ते 190 रुपये किलोपर्यंत खाली आली होती. आता त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हे दर 200 रुपयांच्या पुढे गेले होते.