Double Murder : असं म्हणतात माणूस प्रेमात पडला की तो काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. पण जर ते प्रेम फक्त 20 दिवसांचं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? अवघ्या वीस दिवसांच्या प्रेमासाठी दुहेरी हत्याकांड घडवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलीसही या घटनेने हैराण झाले आहेत.
मुलीनेच आपल्या आई-वडिलांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे अवघ्या 20 दिवसांपूर्वी झालेल्या प्रियकरच्या मदतीने मुलीने आई-बापाला संपवलं.
दुहेरी हत्याकांडाने कानपूर हादरलं
कानपूरच्या बारा परिसरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण कानपूर हादरलं. पहाटेच्यावेळी राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना जितकी भयंकर होती, तितकीच त्यामागची कहाणीही भयानक आहे. कर्मी मुन्नालाल (61) आणि त्यांची पत्नी राजदेवी (55) हे दाम्पत्य मुलगी कोमल आणि मुलगा कोमल यांच्यासह कानपूरच्या ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते. 5 जुलैला मुन्नालाल आणि राजदेवी राहत्या घरात मृतावस्थेत आढळले.
पोलिसांनी सुरु केला तपास
दुहेरी हत्याकांडाने कानपूर हादरलं होतं. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासण्यात आले. यात परिसरातच रहाणाऱ्या रोहित नावाच्या मुलावर पोलिसांचा संशय बळावला. संशयाच्या आधारे पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच रोहितने आपला गुन्हा कबूल केला. पण यामागची कहाणी हैराण करणारी होती.
कहाणीत ट्विस्ट
रोहित हा मृत दाम्पत्याची मुलीग कोमल हिचा दुसरा बॉयफ्रेंड होता आणि ते 20 दिवसांपूर्वीच एकमेकांच्या संपर्कात आले होते. कोमलचा पहिला बॉयफ्रेंड रोहितचा सख्खा भाऊ राहुल होता जो मुंबईत नोकरीला आहे. विशेष म्हणजे कोमलचे दोघांसोबतही प्रेमसंबंध होते. कोमलला रोहित किंवा राहुल यांच्यापैकी एकाशी लग्न करायचं होतं, पण याला कोमलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे कोमल नाराज होती. शिवाय तिला प्रॉपर्टीही हवी होती. यासाठी तिने आई-वडिलांच्या हत्येचा कट रचला.
रोहितने केली डबल मर्डर
5 जुलैच्या पहाटे कोमलने रोहितला घरी बोलावलं. या दोघांनी मिळून आई-वडिलांची हत्या केली. हत्या इतकी भीषण पद्धतीने करण्यात आली होती की संपूर्ण कानपूर हादरलं. आधी चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आला. पण त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता संशयाची सूई कोमलवर आली.
आई आणि कोमल एकाच रुममध्ये झोपले असताना हल्ल्यातून कोमल कशी वाचली, हा प्रश्न पोलिसांनी पडला. तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन जणांनी ही हत्या केल्याचं कोमलने पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांना तिच्या सांगण्यावर संशय आला. हल्लेखोर इतक्या सहजरित्या घरात शिरले कसे असा प्रश्न पोलिसांना पडला.
या सर्व गोष्टींचा विचार करता पोलिसांनी कोमलकडे कसून चौकशी केली. तेव्हा अखेर कोमलने आपला गुन्हा कबूल केला. आई-वडिलांबरोबरच आपल्या भावालाही मारण्याचा कट कोमलने आखला होता. यासाठी तिने आई-वडिल आणि भावाच्या ज्यूसमध्ये विष मिसळून त्यांना दिलं. पण भावाने त्यादिवशी ज्यूस घेतलं नाही.
त्याच रात्री कोमलने रोहितला घरी बोलावलं आणि त्या दोघांनी मिळून आई-वडिलांची गळा चिरून हत्या केली. रोहित दुसऱ्या खोलीत दरवाजा बंद करुन झोपला असल्याने तो बचावला.
आता या प्रकरणी पोलिसांनी कोमल आणि तिचा प्रियकर रोहित या दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.