मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या सरकावर संकट ओढवले असताना सरकारच्या मदतीसाठी धावून आलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी.के. शिवकुमार बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना गेटवरुन माघारी पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, डी. के. शिवकुमार यांनी आपणही या हॉटेलचे बुकिंग केले आहे. त्याबाबतचे तसे पत्रही दाखविले. मात्र, पोलिसांनी त्यांना आता सोडले नाही. तर दुसरीकडे हॉटेलबाहेर काहींनी शिवकुमार 'गो बॅक' असे नारे लगावलेत.
या विषयावर बोलताना शिवकुमार म्हणाले, "मुंबई पोलीस किंवा इतर सुरक्षा दल तैनात केले पाहिजे. त्यांना त्यांचे कर्तव्य करू द्या. आम्ही आमच्या मित्रांना भेटायला आलो आहोत. आम्ही राजकारणात एकत्रित आलो आहोत आणि राजकारणातही आपण एकत्रित मरणार आहोत. ते आमच्या पक्षाचे लोक आहेत. आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत." दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार सोम शेखर यांनी 'झी मीडिया'शी बोलताना सांगितले, त्यांनी केवळ आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आपण काँग्रेस पक्षाचे नेते आहोत.
K'taka crisis: Shivakumar arrives in Mumbai to meet rebel MLAs, says 'born together in politics, will die together'
Read @ANI Story | https://t.co/kxF6MLkLsT pic.twitter.com/527amJAgaR
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2019
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी सरकार पूर्णपणे संकटात सापडले आहे. पण कुमारस्वामी सरकारच्या मदतीला विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार धावून आलेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांपैकी ८ आमदारांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामे दिले आहेत. ते विहीत नमुन्यात नाहीत. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन ते राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे ते स्वखुशीने दिले आहेत किंवा त्यांच्यावर दबाब होता, ही बाबही स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे ते राजीनामे नामंजूर करत आहे. इतर उर्वरित ५ आमदारांनी योग्य पद्धतीने राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी भेटून प्रक्रिया पूर्ण करावी असे म्हटले आहे.
अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेस मैत्री सरकारला सावरायला काही वेळ मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. कुमारस्वामी सरकारकडे पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यांनी तसे राज्यपलांना पत्र पाठविले आहे.
दरम्यान, भाजपने आणखी आमदार गळाला लागतात का, याची चाचपणी सुरु केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विधानसभेतील काँग्रेस-जेडीएसचे संख्याबळ कमी करण्यासाठी भाजपचा जोरदार प्रयत्न होत आहे. दरम्यान, १७ जुलैला बहुमत सिद्ध करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्यातरी निश्चिंत आहेत. विधानसभा अध्यक्षकांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे स्विकारलेले नाहीत.