नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, दररोज नवनवा फोटो किंवा स्टेटस सोशल मीडिया अकाऊंटवर बदलत राहणं. मात्र, हे करताना आपण नियमांचंही पालन करणं फार महत्वाचं असतं.
सोशल मीडियात आपली हटके स्टाईल दाखवणं एका तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. हटके स्टाईलमध्ये फोटो क्लिक करुन तो फेसबूकवर अपलोड करणाऱ्या तरुणाला जेलची हवा खावी लागली आहे.
देहरादूनमधील एका तरुणाने गावठी कट्टा आपल्या हातात घेत फोटो क्लिक केला आणि त्यानंतर तो फोटो फेसबुकवर अपलोड केला.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या तरुणाला अटक केली. पोलिसांनी आरोपी तरुणाकडून गावठी कट्टा ताब्यात घेतला आणि त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला.
हा गावठी कट्टा नेमका आहे कुणाचा आणि या तरुणाकडे आला कसा याची माहितीही पोलीस घेत आहेत. आरोपी तरुणाचं नाव अजय असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी अजयच्या घरी तपासणी केली असता त्याच्याकडे अवैध कट्टा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या चौकशीत अजयने सांगितले की, मी अल्पवयीन आहे आणि फेसबुकवर फोटोज अपलोड करण्याची सवय असल्याने त्याने आपल्या मित्रांसोबत फोटो काढत फेसबुकवर अपलोड केला.
या प्रकरणी पोलिसांनी अजयला न्यायालयात हजर केलं. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजयच्या मते तो अल्पवयीन आहे मात्र त्याच्या वयाचा कुठलाच पुरावा तो सादर करु शकला नाही.