Bihar Crime News : देशभरात लैंगिक अत्याचारांच्या (Sexual assaults) घटनामंध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रोज क्रूरतेच्या सीमा ओलांडल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशातच बिहारची (Bihar News) राजधानी पाटणामध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. क्लासवरुन परतत असताना आठवीतल्या विद्यार्थिनीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर तिला मंदिराजवळ सोडून दिलं. सोमवारी संध्याकाळी हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.
एका आरोपीला अटक
अत्याचारानंतर मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी मुलीचा जबाब नोंदवला असून यामागे पाच नराधमांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यात एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. याआधारे पाटणा बायपास पोलीस ठाण्यात 5 तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.
बोलण्यात गुंतवून विद्यार्थिनीचे अपहरण
घटनेनंतर पीडित मुलीच्या काकांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता मुलगी क्लासमधून अभ्यास करून घरी परतत होती. तेव्हाच एका तरुणाने तिला बोलण्यात गुंतवून बायपास पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जल्ला परिसरात नेले. जिथे निर्जन खोलीत चार मुलं आधीच हजर होती. त्यानंतर चौघांनी मिळून विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांना फोन आला आणि...
बराच वेळ मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांना शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात पोहोचले. याच दरम्यान पोलिसांना फोनद्वारे एका मुलीबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह मुलीचे नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना मुलगी तिथे रडताना दिसली. यानंतर पोलिसांनी तिला उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक अमित रंजन यांनी सांगितले की, "सोमवारी संध्याकाळी पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी बायपास पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांनी सांगितले की विद्यार्थीनी क्लासवरुन रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलीचा शोध सुरू केला असता, ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. प्राथमिक तपासानुसार हा बलात्काराचा प्रकार असल्याचे दिसत असून, विद्यार्थिनीच्या जबाबाच्या आधारे तातडीने कारवाई करत रिक्षा चालकाला अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे."