नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्य़ा प्रमाणात लसीकरण मोहीम वाढवण्यात आली आहे. बोगस लसीकरण घोटाळ्यानंतर आता बुस्टर डोसमध्येही मोठा घोटाळा होत आहे. केंद्र सरकारने केवळ ज्येष्ठ नागरिक, हेल्थ वर्कर्स आणि फ्रेंट लाईनवर काम करणाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे.
बुस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन करताना किंवा त्यासंदर्भात तुम्हाला कोणता मेसेज किंवा फोन आला तर तुम्ही सावध राहाणं गरजेचं आहे. नाहीतर एक मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.
केंद्र सरकारने 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बुस्टर डोस घेण्यासाठी लोकांचीही धडपड सुरू आहे. याचाच फायदा काही फसवणूक करणारे लोक घेत आहेत.
हॅकर्स बुस्टर डोसची माहिती देण्याच्या बहाण्याने लोकांकडून महत्त्वाची माहिती काढून घेत आहेत. ते तपशील नंतर पीडितेच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे तुम्हाला जर या घोटाळ्यात अडकायचं नसेल तर काही गोष्टी कटाक्षानं पाळणं गरजेचं आहे.
कसा होतो घोटाळा?
तुम्हाला बुस्टर डोससाठी एक फोन येईल. तो तुम्हाला सरकारी कर्मचारी असल्याचं सांगेल. तुम्हाला लसीचे आधीचे दोन्ही डोस घेतले की नाही याची विचारणा केली जाईल. काहीवेळा तो तुम्हाला तुमच्या दोन्ही लसीच्या तारखाही सांगेल. तुमचा विश्वास बसावा म्हणून मात्र तुम्ही फसू नका.
हे हॅकर्स शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनाच जास्त आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. तुमचं नाव वय आणि इतर माहिती तो व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक OTP पाठवेल आणि तो OTP तुम्हाला सांगण्याचा आग्रह करेल.
आता इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याला OTP चुकून दिला तर तुमचं अकाऊंड काही सेकंदात रिकामं झालं म्हणून समजा. तुमच्या खात्यातून पैसे गेले. त्यामुळे अशा प्रकरच्या कोणत्याही कॉलला तुम्ही तुमची माहिती देणं, OTP देणं धोकादायक ठरू शकतं.
या हॅकर्सपासून कसं करायचं संरक्षण
कोणताही सरकारी कर्मचारी तुम्हाला फोन करून स्लॉट बुक करत नाही. तुम्हाला कोविड-19 लसीसाठी स्लॉट बुक करायचा असल्यास, तुम्ही http://cowin.gov.in ला भेट देऊ शकता. तुम्ही आरोग्य सेतू मोबाईल ऍप्लिकेशनद्वारेही स्लॉट बुक करू शकता.
जर तुम्ही स्लॉट बुक करू शकत नसाल, तरीही तुम्ही वैध सरकारी ओळखपत्र असलेल्या कोणत्याही लसीकरण केंद्राला भेट देऊन तुमचा डोस मिळवू शकता. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक OTP चा मेसेज तुम्ही काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. हा OTP कोणालाही शेअर करू नका. सांगू नका. तो फक्त तुम्हालाच माहिती असणं गरजेचं आहे.