पाटणा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी शनिवारी एका मानहानी खटल्याप्रकरणी सुनावणीसाठी पाटणा न्यायालयासमोर हजर झाले होते. सुनावणीत न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. या दरम्यान त्यांना भूकही लागली होती. त्यामुळे त्यांनी जवळच एक रेस्टोरन्ट गाठलं आणि इथं त्यांनी डोसा-कॉफीचा आस्वाद घेतला.
न्यायालयातून निघाल्यानंतर राहुल मौर्य लोक स्थित बसंत विहार रेस्टॉरन्टमध्ये राहुल गांधी दाखल झाले. एक टेबल आपल्याकडे खेचून ते आसनस्थ झाले. परंतु, त्यांना इथं असं अचानक आलेलं पाहून रेस्टोरन्टची मात्र धावपळ उडाली. शनिवारी दुपारी अनेक लोक राहुल गांधींना असं अनपेक्षितरित्या पाहून आश्चर्यचकित झाले होते.
रेस्टोरन्टमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनीही मग ही संधी साधली आणि अनेक जण राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्याजवळ पोहचले. राहुल गांधींनीदेखील प्रसन्नतेनं काही कुटुंबांची आणि लहानग्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्याशी हलका संवाद साधला.
यावेळी राहुल यांच्यासोबत शक्ति सिंह गोहिल, खासदार अखिलेश सिंह, प्रेमचंद्र मिश्रा, आमदार अजीत शर्मा यांच्यासहीत अनेक कार्यकर्तेही होते.
सगळ्यांच्या प्रेमाचा आदरपूर्वक स्वीकार करत राहुल विमानतळाकडे रवाना झाले.