बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पांच्या राजीनाम्याची शक्यता

बहुमतापूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे.

Updated: May 19, 2018, 03:19 PM IST
बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पांच्या राजीनाम्याची शक्यता title=

बंगळुरू : बहुमतापूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. बहुमत चाचणीला अवघा एक तास शिल्लक असताना येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसा निरोप त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला पाठवला असल्याचं सांगण्यात येत आहे. बहुमत जुळण्याची शक्यता कमी असल्याने असं म्हटलं जात आहे. बहुमतासाठी ६ आमदारांची गरज आहे, ती पूर्ण होत नसल्याने, बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देतील असं अंदाज आहे. तसेच बहुमत चाचणीपूर्वी भाजपाच्या गोटात मोठी निराशा देखील दिसून येत आहे. बहुमताचा आकडा पार करण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्याने, येडियुरप्पांकडून आपली भूमिका भाषणातून मांडल्यानंतर ते राजीनामा सोपवतील असं म्हटलं जात आहे.

येडिययुरप्पा यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाला, बहुमत नसल्याने राजीनामा देण्याचा निरोप दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या आटापिटा करूनही भाजपा बहुमतापासून दूर तर नाही ना, असा आरोप होत आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या १३ पानी भाषणाची तयारी केली असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

आमदारांना भावनिक आव्हान करू शकतात

मात्र या भाषणात येडियुरप्पा लिंगायत आमदारांना भावनिक आव्हान करू शकतात, आणि यामुळे आणखी १-२ विरोधी आमदार गळ्याला लागतील का, असा सुद्धा प्रयत्न असू शकतो. बहुमत सिद्ध कऱण्यासाठी अवघे २ तास बाकी आहेत. दरम्यान काँग्रेसचे दोन आमदार अजूनही गायब आहेत, येडियुरप्पांच्या मुलांनी आमच्या २ आमदारांना डांबून ठेवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, त्याच्या तपासासाठी बंगळुरूचे पोलीस आयुक्त एका हॉटेलात देखील पोहोचले आहेत.