America Deport Indian Migrants : रविवारी रात्री उशिरा अमृतसर इथं अमेरिकेतून बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या जवळपास 112 भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल झाली. यापूर्वी शनिवारी 116 भारतीयांना घेऊन अमेरिकी विमान भारतात दाखल झालं होतं. अमेरिकेत कायद्याचं उल्लंघन करून वास्तव्यास असणाऱ्या या भारतीयांवर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली.
परतीच्या प्रवासादरम्यान या निर्वासित भारतीयांच्या हातात बेड्या ठोकण्याल आल्या होत्या, पायातही साखळदंड होते असं त्यांनी सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकी लष्कराचं एक विमान रविवारी रात्री 10 वाजून 3 मिनिटांच्या सुमारास अमृतसर विमानतळावर दाखल झालं. या 112 प्रवाशांमध्ये 44 नागरिक हरियाणाचे, 33 गुजरातचे, 31 पंजाबचे, दोन नागरिक उत्तर प्रदेशचे आणि हिमाचल प्रदेशातील असल्याचं सांगण्यात येतं. विमानतळावर दाखल झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना आपआपल्या गावी पाठवण्यात आलं.
भारतातून अमेरिकेच मुक्कामी गेलेल्या या भारतीयांनी त्यांच्या या परदेशातील मुक्कामासाठी किंबहुना हा देश गाठण्यासाठी लाखोंचा खर्च केला. या निर्वासितांपैकी एक असणाऱ्या सौरवनं दिलेल्या माहितीनुसार परदेशात पाठवम्यासाठी त्याच्या कुटुंबानं 45 ते 46 लाखांचा खर्च केला. दोन एकरांची शेती विकली आणि नातेवाईकांकडून कर्जही घेतलं.
या प्रवासादरम्यान सौरवनं अॅम्सटरडॅम, पनामा, मेक्सिको असा प्रवास करत अखेर अमेरिका गाठली. अमृतसरला येतेवेळी बेड्या ठोकल्या होत्या का? असा प्रश्न विचारला असता त्यानं होकारार्थी उत्तर देत आपल्या हातापायांमध्ये बेड्या असल्याचं सांगितलं.
#WATCH | Punjab: Aircraft carrying the third batch of illegal Indian immigrants lands in Amritsar as it arrives from the US. pic.twitter.com/siuyMUTbMP
— ANI (@ANI) February 16, 2025
घरदार, शेतशिवार विकून सारंकाही पणाला लावत देश आणि हक्काचं घर सोडून अनेकांनी परदेशाची वाट धरली. पण, कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वच बेकायदेशीररित्या मुक्कामी असणाऱ्या भारतीयांना अमेरिकेनं दणका देत मायदेशी पाठवलं.