मुंबई : गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
बरेचदा, या दिवसात अनेकदा बाहेर फिरायला जाण्याच्या प्लाँन होतो अशावेळी प्रत्येकाने काही नियम पाळणे गरजेचे असल्याच मत मधुमेहतज्ञ डाँ. रोशनी प्रदिप गाडगे यांनी व्यक्त केले. अशा रूग्णांनी या दिवसात अधिक दक्ष राहणे आवश्यक असून कुठे बाहेर फिरायला अथवा कामानिमित्त जात असाल तर योग्य ती खबरदारी तसेच गरजेची औषधे सोबत ठेवणे आवश्यक आहे.
अति उच्च तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन साखरेचे प्रमाण घटल्याने भोवण येऊन रूग्ण कुठेही पडू शकतो. तसेच मधुमेह असणा-या रूग्णांना डिहायड्रेशनमुळे थेट किडनीवर परिणामकारक ठरू शकतो. क्रिएटीन चे प्रमाण अधिक होऊन किडनी निकामी होण्याची शक्यताही असते. बरेचदा अशा रूग्णांना उष्णतेमुळे अनवानी चालल्यास अत्सर होण्याची शक्यता असते. जसे बरेचदा, बाहेर म्हणजे मंदिर अथवा इतर ठिकाणी जिथे पादत्राणे काढून ठेवावी लागतात अशावेळी मधुमेह असणा-या रूग्णांना पायांना उष्णतेचे फोड किंवा जळजळ होऊन त्या ठिकाणी पुढे जखम होण्याची शक्यता असते. अशा जखमांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे अन्यथा सेप्टीक होण्याची शक्यता असते.
ज्या रूग्णांना टाईप १ चा मधुमेह आहे अशा रूग्णांनी बाहेर जाताना सोबत इन्शुलिन पाऊच ठेवणे आवश्यक आहे. या दिवसात इन्शुलिन ठेवण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते परंतू, अतिउष्णता असल्याने इन्शुलिन साठवून ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा हे इन्शुलिन खराब होऊ शकते. अशावेळी जास्त काळजी घेऊन योग्य त्या तापमानात इन्शुलिन ठेवणे गरजेचे आहे.
बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णांनी ग्लुकोमिटर, ग्लुकोस्ट्रीप्स,निंबू पाणी, मीठपाणी, कोकम सरबत (साखर विरहित) ठेवल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून वरील पेय घेता येऊ शकतात.