नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषधं नाही. पण यावरील लक्षणं ओळखून कोरोनावर उपचार सुरु आहेत. मात्र शास्त्रज्ञांकडून आता यावरील लक्षणांबाबत एक खुलासा करण्यात आला आहे. सुगंध, फूलांचा गंध, कचऱ्याची दुर्गंधी हे वास घेता येत नसतील तर ही बाब धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. हेच लक्षण कोरोना व्हायरसचं पहिलं लक्षणं असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. इंग्लंडमधील शास्त्रज्ञांना त्यांच्या तपासात, केवळ सुका खोकला आणि ताप ही कोरोनाची लक्षणं नसल्याचं आढळून आलं आहे. व्हायरस आपल्या शरीरात हल्ला करण्यापूर्वी काही लक्षणं दाखवण्यास सुरुवात करतं. त्यावरच लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय.
ब्रिटिश रायनोलॉजिकल सोसायटीने केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की, कोरोना व्हायरस त्याची काही लक्षणं आधीच दाखवण्यास सुरुवात करतो. उदाहणार्थ, जर आपल्याला आजूबाजूच्या वस्तूंचा वास ओळखता येत नसल्यास किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाची चव येत नसल्यास कोरोनाने शरीरात प्रवेश केला असल्याचं ओळखावं, संशोधनानुसार असं सांगण्यात आलंय. रायनोलॉजिकल सोसायटीचे डॉक्टर क्येयर हॉपकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारची काही लक्षणं दिसल्यास त्वरित स्वत:ला इतरांपासून वेगळं करुन क्वारंटाईन करुन घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये वास आणि चव यावरुन 2000 कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. त्यापैकी 30 टक्के लोकांनी, त्यांना अनेक दिवसांपूर्वीपासून वास ओळखण्यात समस्या येत असल्याच सांगितलं. या लोकांकडून जेवताना जेवणाची चवही येत नसल्याचं सांगण्यात आल्याचं या संशोधनातून म्हटलंय.
अमेरिकी वैज्ञानिकांनीदेखील कोरोना व्हायरस संसर्गाच्या सर्वात सुरुवातीची लक्षणं नाक आणि तोंडाद्वारे ओळखण्यात येत असल्याचं म्हटलंय. आपल्या तपासात अमेरिकी शास्त्रज्ञांनांना, ज्या लोकांची वास घेण्याची, चव न ओळखण्याची शक्ती कमी झाली होती, त्या सर्वांना अखेर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं.