२० वर्षीय मुलीच्या पोटात आढळला तब्बल ७५० ग्रॅम केसाचा गुंता

मुंबई : बाहेरचे अन्न घेतल्याने पोटाचे आजार बळावतात. तर कधी एखादी वस्तू पोटात गेल्यास समस्या उद्भवतात. काही वेळा खाताना पोटात केस गेल्याचीही घटना आपण ऐकली असेल. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 6, 2017, 06:46 PM IST
२० वर्षीय मुलीच्या पोटात आढळला तब्बल ७५० ग्रॅम केसाचा गुंता title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : बाहेरचे अन्न घेतल्याने पोटाचे आजार बळावतात. तर कधी एखादी वस्तू पोटात गेल्यास समस्या उद्भवतात. काही वेळा खाताना पोटात केस गेल्याचीही घटना आपण ऐकली असेल. अन्नातून पोटात एखादा केस जाणे ठीक आहे. पण एका २० वर्षीय मुलीच्या पोटात तब्बल ७५० ग्रॅम केसाचा गुंता सापडला. आता इतके केस पोटात कसे गेले, याचे कारण डॉक्टरांना सुरुवातीला लक्षात आले नाही. मात्र आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर पोटात इतके केस कसे गेले याचे निदान झाले.

मागील काही दिवसांपासून आपले वजन वेगाने कमी होत असल्याची तक्रार घेऊन एक तरुणी मुंबईच्या घाटकोपरमधील एका डॉक्टरांकडे आली. रुग्णालयात आली तेव्हा तिचे वजन केवळ ३० किलो होते. विविध तपासण्यांनंतर तिला दुर्मिळ असा रॅपन्झेल सिंड्रोम आजार झाल्याचे निदान झाले. 
या मुलीला केस खाण्याची सवय असल्याने तिच्या पोटात २५ सेंटिमीटर लांब ७५० ग्रॅमचा केसाचा गुंता सापडला. हा गुंता शस्त्रक्रिया करुन काढावा लागणार असल्याने तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे केस पोटात विविध भागात अडकले असल्याने ते काढणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. मात्र शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हा गुंता बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीला दीर्घकाळापासून केस खाण्याची सवय होती. केसाचे शरीरात पचनही होत नाही आणि तो शौचाव्दारे बाहेरही जात नाही. पोटात अशाप्रकारे केसांचा गुंता असल्याने पोट भरल्यासारखे वाटून मुलीला भूक लागत नव्हती आणि अन्नही जात नव्हते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये रुग्णाला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याचीही आवश्यकता असते. २०१६ पासून या आजाराचे आतापर्यंत जगभरात केवळ ८८ रुग्ण सापडले आहेत.