Bollywood Kissa: बॉलिवूडच्या महान कलाकार आणि दिग्दर्शकांचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा राज कपूर हे नाव आपसूकपणेच घेतलं जातं. चित्रपटांप्रमाणे राज कपूर यांचं खासगी आयुष्यही फिल्मी असून त्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले होते. पडद्यावर आणि पडद्याच्या मागे असं दोन्हीकडे ते शोमॅन म्हणूनच ओळखले गेले. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र यातील सर्वाधिक चर्चेत राहिलं ते त्यांचं आणि अभिनेत्री नर्गिस यांच्यातील नातं. विवाहित असूनही राज कपूर यांचे नर्गिस यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. अनेक वर्षांनी ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात वडील विवाहित असून अनेक अभिनेत्रींशी त्यांचे प्रेमसंबंध होते अशी कबुली दिली होती.
एकदा स्वत: राज कपूर यांनी आपल्या नर्गिस यांच्या नावाचा उल्लेख न करता फक्त अभिनेत्री असं म्हणत प्रेमसंबंधाची कबुली दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या कृतीचं समर्थन करताना असा दावा केला होता की, त्यांच्या आयुष्यातील महिलांना त्या एकमेकांच्या पर्याय नाहीत आणि त्या स्वतःला इतरांपेक्षा दुय्यम समजत नाहीत हे माहिती होतं.
नर्गिस यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली त्या फक्त 16 वर्षांच्या होत्या. यावेळी राज कपूर आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलंही होती. पण या भेटीने त्यांच्यावर एक छाप सोडली होती. 1973 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्लॉकबस्टर 'बॉबी' चित्रपटात तो क्षण दाखवला होता. या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत होते.
"ती खूप तरुण होती. एखाद्या परिप्रमाणे, अगदी... ती फार उत्तम अभिनेत्री होती. माझ्यासाठी चित्रपट म्हणजे पूर्ण, परिपूर्ण, समर्पित भक्ती आणि आपलेपणा. म्हणून, त्याभोवती फिरणारी कोणतीही व्यक्ती आणि काहीही माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनले. आणि मी हे नक्कीच म्हणेन की तिने (नर्गिस) आरके (स्टुडिओ) जे काही आहे त्यात खूप योगदान दिले आहे," असं राज कपूर यांनी प्रसार भारती निर्मित एका माहितीपटात त्यांचे जीवन आणि वारसा वर्णन करताना म्हटलं होतं.
"अगदी सुरुवातीपासूनच, मी एक रेष आखली होती. माझी पत्नी माझी अभिनेत्री नाही आणि माझी अभिनेत्री माझी पत्नी नाही हे माझ्या मनात अगदी स्पष्ट होता. माझ्या पत्नीचा अर्थ, माझ्या मुलांची आई आहे. त्यामुळे माझं घरगुती जीवन तिथे होतं. कृष्णा माझ्या मुलांची आई होती. याउलट इथे माझी अभिनेत्री होती. ती माझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये योगदान दिल्याबद्दल समाधानी असायची आणि ते वाटून घ्यायची. हेच तिचे समाधान आहे," असं ते म्हणाले होते. त्यांनी आपला कधीही नर्गिस यांच्याशी लग्न करण्याचा हेतू नव्हता आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करताना प्रेमसंबंध टिकवून ठेवण्याची त्याची इच्छा होती असं सांगितलं होतं.
पुढे ते म्हणाले होते, "मी कधीही माझ्या पत्नीला माझी अभिनेत्री आणि अभिनेत्रीला माझी पत्नी करण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे मी समतोल राखू शकलो. आम्ही वर्षानुवर्षे पूर्ण तीव्रतेने काम करत राहिलो. कारण, प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी होते. कोणालाही कोणत्याही प्रकारे दुय्यम दर्जा देण्याचा अनुभव आला नाही. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही पूर्णपणे सर्वोच्च आहात. आणि मग, दुसरी गोष्ट, त्यांचा समजूतदारपणा. प्रत्येकाने समजून घेतले आणि कोणीही कोणालाही फसवले नाही. माझ्या मुलांची आई माझी अभिनेत्री बनण्यासाठी नव्हती, म्हणून तिला फसवले गेले असं वाटलं नाही. मला तसं वाटले नाही. आणि त्याचप्रमाणे, ती अभिनेत्री माझ्या मुलांची आई नाही तर माझी अभिनेत्री बनून माझ्या आयुष्यात आली”.
राज कपूर यांच्यावर गाढ प्रेम असूनही, नर्गिस यांना अखेर ते पत्नीला कधी सोडणार नाही हे मान्य करावं लागलं. अखेर 1958 मध्ये त्यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं. पण राज कपूर यांनी याकडे विश्वासघात म्हणून पाहिलं. मधू जैन यांच्या "द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा" या पुस्तकानुसार, कपूर यांनी एकदा पत्रकार सुरेश कोहली यांना '"जग मला सांगते की मी नर्गिसला निराश केले, पण तिनेच मला विश्वासघात केल," असं सांगितलं होतं.
पुस्तकानुसार राज कपूर त्यांच्या लग्नानंतर खूप निराश झाले होते. "जेव्हा त्यांना नर्गिस यांनी सुनील दत्तशी लग्न केलं आहे असं समजलं तेव्हा ते मित्र आणि सहकाऱ्यांसमोर रडले होते. ते पूर्णपणे तुटले होते. राज कपूर यांना खूप वाईट वाटलं होतं. आपण स्वप्न पाहत नाही आहोत ना हे तपासण्यासाठी तो स्वतःला सिगारेटचे चटके देत असत. ती असं कसं करु शकते याचं आश्चर्य त्यांना वाटत होतं".