मुंबई : काही कलाकार हे ज्यावेळी रुपेरी पडद्यावर झळकतात तेव्हा त्यांचा वावरच संपूर्ण माहोल बदलून जातो. अभिनेत्री कतरिना कैफ हीसुद्धा त्यापैकीच एक. अभिनयासोबतच आपल्या नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही सौंदर्यवती पुन्हा एकदा एका नव्या रुपात चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना 'सुरैय्या'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा सहभाग असणाऱ्या 'सुरैय्या' या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये तिचा एकंदर अंदाज पाहता पुन्हा एकदा ती सर्वांचच लक्ष वेधण्यासाठी सज्ज झाल्याचं कळत आहे.
'सुरैय्या'च्या निमित्ताने ती पुन्हा एकदा काही अफलातून नृत्याविष्कार सादर करताना दिसत असून, यासाठी तिला कास मदत झाली आहे ती म्हणजे डान्सिंग सुपरस्टार प्रभू देवाची.
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सुरैय्यासाठी तिने नेमकी किती मेहनत घेतली हे पाहायला मिळत आहे.
प्रभू देवा त्याच्या नृत्यशैलीने गाण्याला नवी ओळख देतो, असं तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
'मुख्य म्हणजे गाण्यासाठीच्या तालमीसाठीसुद्धा प्रभू देवाने फार वेळ दिला असल्याचं म्हणत अंतिम स्वरुपी जे गाणं तयार होऊन सर्वांसमोर आलं आणि ती एक स्टेप गाण्याच अतिशय महत्त्वाची ठरली याचा आनंद काही वेगळाच होता', असंही ती या कॅप्शनमधून म्हणाली आहे.
प्रभू देवाच्या मार्गदर्शनाच्या मदतीने थिरकणाऱ्या 'सुरैय्या'चा हा अंदाज आता चित्रपटाच्या यशात कितपत फाद्याचा ठरणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.