'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'

Allu Arjun Bail: हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने अल्लू अर्जूनला जामीन दिला आहे. अल्लू अर्जूनच्या वकिलांनी कोर्टात शाहरुख खानसंबंधी एका केसचा दाखला दिला.   

शिवराज यादव | Updated: Dec 13, 2024, 07:38 PM IST
'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...' title=

Allu Arjun Granted Bail: 'पुष्पा 2' चित्रपटामुळे देशभरात चर्चेत असलेल्या अल्लू अर्जूनसाठी 13 डिसेंबरची सकाळ अडचणीची ठरली. एकीकडे 'पुष्पा 2' यशाचे नवे रेकॉर्ड रचत असताना याच चित्रपटामुळे त्याच्यावर अटक होण्याची वेळ आली. हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात 'पुष्पा 2' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. कोर्टात हजर करण्यात आलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र नंतर हायकोर्टाने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. 

कोर्टाने काय म्हटलं?

त्याच्या सुटकेचा आदेश देताना, तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हवाला दिला आणि म्हटलं की "फक्त तो एक अभिनेता आहे म्हणून त्याला अशा प्रकारे धरुन ठेवलं जाऊ शकत नाही." कनिष्ठ न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या अटकेला सोमवारपर्यंत स्थगिती देण्याची याचिकाही कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावली होती.

अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...'

 

शाहरुख खानचा उल्लेख

हायकोर्टात सुनावणीदरम्यान अल्लू अर्जूनच्या वकिलांनी शाहरुख खानशी संबंधित एका प्रकरणाचा दाखला दिला. वकिलांनी शाहरुख खानच्या एका कार्यक्रमात अशाप्रकारे झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण करुन दिली. अभिनेत्याच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, "रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुखला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीकडे शाहरुख खानने काही टी-शर्ट्स फेकले होते ज्यामुळे धावपळ झाली होती. या धावपळीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशात शाहरुख खानविरोधात गुन्हा दाख झाला होता. पण गुजरात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली होती".

शाहरुख खानला दोषमुक्त करणारा निकालही वकिलाने न्यायालयात वाचून दाखवला. त्यात असं लिहिलं होतं की, "चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू थेट अभिनेत्याशी असेल तरच अभिनेत्यावर आरोप झाले असते. आमच्या बाबतीत अभिनेता पहिल्या मजल्यावर होता आणि महिला तळमजल्यावर होती. अभिनेता 9.40 वाजता तिथे गेला. हा सर्व प्रकार खालच्या भागात घडला असून महिला व बालक तिथेच अडकून पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कलाकारही तिथे येत असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी या अभिनेत्याला येण्यापासून रोखले नाही. थिएटरने अभिनेत्याला येण्यास नकार दिला नाही. कलाकार फक्त चित्रपट पाहत होते. शाहरुख खानही त्यावेळी काहीतरी करत होता. इथे कलाकार फक्त चित्रपट बघत होते".