नवी दिल्ली : दाक्षिणात्य कलाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेता नागार्जुन याच्याकडे कायमच एक चिरतरुण चेहरा म्हणून पाहिलं जातं. नगार्जुन यांच्या कुटुंबाबाबतही चाहत्यांमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. त्यांच्या कुटुंबातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे सूनबाई, अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni).
समंथानं तिच्या अभिनयाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. शिवाय एका सेलिब्रिटी कुटुंबाची सून म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्य याच्याशी 2017 मध्ये समंथानं लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासूनच तिनं सोशल मीडियावर नाव बदलत समंथा रुथप्रभूवरुन हे नाव समंथा अक्किनेनी असं केलं होतं.
पण, आता मात्र तिनं ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नावातील अक्किनेनी हे आडनाव वेगळं केलं आहे. फेसबुकवर मात्र तिचं हे आडनाव कायम आहे. समंथानं केलेल्या या बदलानंतर चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. तिच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल आहे ना, अशा शब्दांत काहींनी चिंताही व्यक्त केली. दरम्यान समंथानं अद्यापही या बदलबाबात कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा माहिती दिलेली नाही.
सेलिब्रिटी वर्तुळातही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तेव्हा आता यामागे नेमकं काय कारण असेल याचा खुलासा समंथा केव्हा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.