मुंबई : बायोपिक आणि युद्धपटांना प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचाही याकडेच कल दिसत आहे. याच ट्रेंडचा आधार घेत आणखी एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची शौर्यगाथा या चित्रपटातून पाहता येणार आहे.
महेश बाबूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचा पोस्टर सर्वांच्या भेटीला आणला आणि त्यासोबतच या चित्रपटात मेजरची व्यक्तीरेखा कोण साकारणार आहे, यावरुनही पडदा उचलला. शहीद संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारायला आव़डली असती, असं म्हणणाऱ्या महेश बाबूने या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अभिनेता सेश अदिवी याला शुभेच्छा दिल्या.
महेश बाबूने पोस्ट केलेल्या मेजर या चित्रपटाच्या पोस्टरविषयी सांगावं तर, एक कमांडो मोठ्या रुबाबात कोणा एका गोष्टीकडे टक लावून पाहत आहे, असं त्या पोस्टरमधून भासवण्यात येता आहे. त्या कमांडोने घातलेल्या गणवेशावर संदीप असं नावही स्पष्ट दिसत आहे. पण, ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संपूर्ण चेहरा मात्र दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट आतापासूनच कलाविश्वात उत्सुकता वाढवत आहे.
शशी किरण टिक्का दिग्दर्शित 'मेजर'च्या महेशबाबू निर्मात्याची भूमिका पार पाडणार आहे. त्याविषयीच माहिती देत महेशबाबूने आपण सक्रिय निर्माता नसल्याचं स्पष्ट केलं. चित्रपटांविषयी असलेलं प्रेम आणि काही चांगल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या दोन गोष्टींनाच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.