नवी दिल्ली : हॉलिवूडमध्ये धम्माल उडवून देणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा सध्या भारतात आहे. बुधवारी प्रियांकानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. प्रियांकानं पीएम मोदी यांना लवकरच होणाऱ्या एका कॉन्फरन्सचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. ही कॉन्फरन्स आई, नवजात बालकं आणि मुलांच्या आरोग्याशी निगडीत आहे.
या भेटीदरम्यान प्रियांकसोबत आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि चिलीच्या माजी पंतप्रधान मिशेल बेकलेट यादेखील उपस्थित होत्या. सदर कॉन्फरन्स याच वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीत आयोजित केली जाणार आहे.
प्रियांका चोपडा हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केलाय. प्रियांकानं या भेटीसाठी पांढऱ्या रंगाचा एक ड्रेस परिधान केला होता. फोटो शेअर करताना प्रियांकानं मोदींचे आभार मानले. 'मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभारी आहे. मी, श्री जे पी नड्डी आणि श्रीमती मिशेल बेशलेट यांनी आज मोदींची भेट घेतली. आणि याच वर्षी डिसेंबर महिन्यात दिल्लीत होणाऱ्या पार्टनर्स फोरमशी संबंधित विषयावर चर्चा केली' असंही प्रियांकानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
प्रियांका चोपडा ही युनिसेफची गुडविल अॅम्बेसेडर आहे. या वर्षी भारतात 92 देशांतून येणाऱ्या 1200 हून अधिक प्रतिनिधिंसोबत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा 'पार्टनर्स फोरम' आयोजित करण्यात येतय. आमची ही भेट अतिशय सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारी ठरलीय... कारण इथं उपस्थित सर्वांचं एकच लक्ष्य होतं.
प्रियांका लवकरच अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वांटिको'च्या तिसऱ्या सीझनमध्ये टीव्हीवर दिसणार आहे. यासोबतच ती बॉलिवूडच्या सिनेमांतही काम सुरू करणार आहे.