मुंबई : ऋग्वेदात पृथ्वीला 'माता' म्हटले आहे. माता म्हटल की ती तिच्या मुलांच्या सगळ्या चुका आपल्या पदरात घेत असते. पण आता तिच्या मुलांच्या चुका तिला असहाय्य होत आहेत. नवरात्रीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.
पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी महालक्ष्मी, पाचव्या दिवशी शेरावाली माता, साहव्या दिवशी तुळजाभवानी, सातव्या दिवशी मुंबादेवी अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या तेजस्विनीने नवमीला 'पृथ्वी माते'चं रूप धारण केलं आहे.
पृथ्वी मी अदिती मी, आदि मी अनंत मी... तू जाळले मला जरी, कृपाच वर्षवेन मी... घुसमटला कंठ माझा तरी, दान प्रणाचेच देईन मी... ज्ञान शिडे उभारुनी जग जिंकण्याचा खेळ तुझा चालला, पण उत्पत्ती स्थिती प्रलय हा अंतिम धर्म आहे आपुला.
या धर्म क्षेत्री सदा अशीच अचल राहीन मी... तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी, तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी !! अशा प्रकारचे वास्तवदर्शी फोटो शेअर करत ती समाजामध्ये जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.