मुंबई : आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला सिनेमा म्हणजे 'मुन्नाभाई एमबीबीएस'. 2003 साली प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला. या सिनेमातील एक अभिनेता गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता विशाल ठक्कर 2015 पासून हरवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. विशालचा गेल्या तीन वर्षांपासून त्याच्याशी कुणाशीही संपर्क झालेला नाही. विशालची चौकशी सुरू आहे पण अद्याप त्याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणत्याही रूग्णालयात किंवा पोलीस स्थानकात कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
31 डिसेंबर 2015 साली रात्री जवळपास 10.30 च्या आसपास विशाल आपल्या आईकडून 500 रुपये घेऊन घरातून निघाला. आईला सांगितलं की, मी सिनेमा पाहून येतो. त्याने आईला देखील सोबत येण्यास सांगितलं पण त्या न आल्यामुळे तो एकटाच गेला. त्यानंतर विशालने वडिलांना मॅसेज करून मी पार्टीत जाणार आहे आणि उद्याच घरी येईल अशी माहिती दिली. एवढंच नव्हे तर त्याने फेसबुकवर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
1 जानेवारी 2016 रोजी त्याचा फोन बंद झाला असून तो पुन्हा कधी परत आलाच नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल 1 जानेवारीला सकाळी 11.45 मिनिटांनी घोडबंदर रोडवर गर्लफ्रेंडसोबत शेवटचा दिसला. मात्र गर्लफ्रेंडला दिलेल्या माहितीनुसार, तिला भेटून तो रिक्षा पकडून निघून गेला.
तेव्हापासून अद्याप या अभिनेत्याची काहीच माहिती मिळालेली नाही. त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.