मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात उपचारा दरम्यान आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने कला-मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.
लता मंगेशकर यांना लतादीदी किंवा लता या नावाने ओळखलं जातं. आज त्यांनी 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. जी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांच्या तोंडावर गुणगुणली जातात. मात्र लता मंगेशकर यांचं खरं तुम्हाला माहीत आहे का?
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर इथे झाला होता. त्यांचं नाव हेमा ठेवलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना लता या नावाने ओळखलं जाऊ लागलं. लतादीदींनी आपल्या वडिलांच्या एका नाटकात काम केलं होतं. त्या नाटकात तिची लतिका म्हणून भूमिका होती.
या भूमिकेनंतर हेमा नाव मागे पडलं तर लतिकावरून लता हे नाव पुढे आलं. या नाटकानंतर त्यांना सगळेजण लता या नावाने हाक मारू लागले. लता मंगेशकर आपल्या 5 भावंडांसह लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ राहात होत्या. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी नंतर लग्नाच्या विचारही केला नाही.
मराठी, हिंदीसोबत इतर भाषांमध्ये त्यांनी एकापेक्षा एक उत्तम गाणी गायली. ए मेरे वतन के लोगो या गाणं आजही ऐकलं डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. लता मंगेशकर यांच्यासोबत आशा आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.