मुंबई : लता मंगेशकर या प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेणाऱ्या गानकोकिळेनं जगाचा निरोप घेतला आणि जणूकाही अखंड सुरु असणारं एक गाणंच कायमचं थांबलं. जीवनातील बराच काळ, गायनकलेला समर्पण करणाऱ्या दीदी अनेकांच्याच आदर्शस्थानी. अशा या दीदी आज मात्र मनाला चटका लावून आपल्यातून निघून गेल्या.
तुम्हाला माहितीये का, एक काळ गाजवणाऱ्या या गायिकेचं आयुष्य वयाच्या 32 व्या वर्षी धोक्यात आलं होतं. त्यांचा आवाज कायमचा बंद व्हावा यासाठी रचलेला तो कट होता.
खुद्द लता मंगेशकर यांनीच हा खुलासा एका मुलाखतीत केला होता. ही घटना आहे, 1962 मधील. जेव्हा भारत- चीन युद्धादरम्यान त्या आजारी होत्या. पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि त्यांना उलट्या सुरु झाल्या.
पुढचे तीन महिने त्या गाऊ शकल्या नाहीत. हा कंठ तीन महिन्या सुरांपासून दूर होता. तीन दिवस वेदना असह्य होऊ लागल्या. हे पाहून डॉक्टरांनी त्यांना बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन दिलं.
जीवन- मृत्यूचा संघर्षच तो. त्यातून दीदी बचावल्या आणि त्यांना एक नवं आयुष्य मिळालं. यावेळी त्यांना अन्नातून विषची बाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
दीदींच्या आचाऱ्यावरच यासाठी संशय व्यक्त करण्यात आला होता. कारण एकाएकी तो कुठेच दिसेनासा झाला होता. यानंतर दीदींच्या जेवणाची जबाबदारी त्यांच्या बहिणीनं घेतल्याचं म्हटलं गेलं.
जीवनात आव्हानाचे प्रसंग आले पण, त्या प्रसंगांमध्येही गायनापासून दीदी कधीच दूर झाल्या नाहीत. मेरी आवाज ही पहचान है... हे शब्द जेव्हा त्यांच्या तोंडातून बाहेर पडले तेव्हा जणू ते त्यांच्यासाठीच लिहिले गेल्याची अनुभूती झाली.
लता मंगेशकर यांनी ‘महल’ या चित्रपटातून गाणं गायलं आणि साऱ्यांनीच या आवाजावर उत्स्फूर्त दाद दिली. जवळपास 20 हून जास्त भाषांमध्ये त्यांनी 30 हजारहून अधिक गाणी गायली.
संघर्षापासून यशापर्यंतचा दीदींचा हा प्रवास सर्वांनाच आपुलकीचा वाटला. कुटुंबासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. अखेर आज त्या सर्व पाशांतून मोकळ्या झाल्या आणि एका दुसऱ्या दुनियेत स्थिरावल्या.