बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा 'परिंदा'चंही नाव साहजिकपणे घेतलं जातं. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडवर उमटवलेली आपली छाप अद्यापही कायम आहे. नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. दरम्यान या चित्रपटाचं शुटिंग करताना विधू विनोद चोप्रा आणि नाना पाटेकर यांच्या अक्षरश: हाणामारी झाली होती. विधू विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकर यांचा कुर्ता फाडला होता. विधू विनोद चोप्रा यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला 12th Fail चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विधू विनोद चोप्रा यांनी 'सारेगमप' कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यासह झालेल्या भांडणाचा किस्सा सांगितला होता.
"मी काश्मीमधून असल्याने फार सभ्य होतो. आता मी भरपूर देतो, पण सुरुवातीला शिव्या देत नव्हतो. नानापासून त्याची सुरुवात झाली. मी परिंदा चित्रपटात त्याला दिग्दर्शित करत असताना शिव्या घालायचा. यानंतर मी पण शिव्या देण्यास सुरुवात केली. नानाला दिग्दर्शित करण्यासाठी मी शिव्या शिकलो," असा खुलासा विधू विनोद चोप्रा यांनी केला.
पुढे ते म्हणाले "अजून एक किस्सा आहे. माझी बायको मेली, तरी डोळ्यात पाणी आहे का? असा डायलॉग असणारा नानाचा एक सीन आहे. आम्ही सकाळी 7 पासून शूट करत होतो आणि रात्रीचे 8 वाजले होते. नाना म्हणाला आता मी थकलो आहे, उद्या शूट करुयात. मी घरी जात आहे. मी म्हटलं ठीक आहे माझे पैसे परत कर. त्याने मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. मी पण तोपर्यंत शिव्या शिकलो होतो. मी त्याचा कुर्ताच फाडून टाकला. यामुळेच त्या सीनमध्ये नाना बनियनमध्ये आहे. कारण कुर्ता फाटला होता. आम्ही भांडत असताना कॅमेरामन सीन रेडी आहे असं म्हणतो. त्यानंतर मी मागे वळलो आणि नानाही सीनसाठी खुर्चीवर जाऊन बसला. त्या सीनमध्ये नानाच्या डोळ्यात जे पाणी आहे ते खरं आहे".
सीन संपल्यानंतर नानाने मला मिठी मारली आणि रडू लागला. या सीनसाठी मी घाबरलो होतो असं त्याने सांगितलं. असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट फक्त 12 लाखात तयार झाला होता असंही विधू विनोद चोप्रा यांनी सांगितलं.
12th Fail चित्रपटात एका तरुणाचा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयपीएस अधिकारी होण्याचा प्रवास उलगडण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विधू विनोद चोप्रा यांनी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं आहे. ते सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.