मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून चित्रपट साकारण्याच्या क्षेत्रात काही ट्रेंड चांगलेच स्थिरावत आहेत. यामध्ये बायोपिकचा ट्रेंड, त्यातही खेळाडूंच्या आयुष्यावर बेतलेले चित्रपट साकारण्याला प्राधान्य देण्याचा समावेश होतो. शिवाय आणखी एका ट्रेंडला बी- टाऊनकडून आणि प्रेक्षकांक़डूनही चांगलीच पसंती मिळते. तो ट्रेंड म्हणजे चित्रपटांचा रिमेक करण्याचा.
विविधभाषी चित्रपटांचा रिमेक करत बॉलिवूड कलाकारांच्या साथीने तो नव्या ढंगात सादर करण्याला निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी कायमच पसंती दिली. मुख्य म्हणजे कलाविश्वातील ही प्रयोगशीलता प्रेक्षकांनाही भावली. त्याचं एक यशस्वी उदाहरण म्हणजे 'कबीर सिंग'.
'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटामुळे शाहिद कपूर सध्याच्या घडीला बॉलिवूड वर्तुळात चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. कायमच काही चौकटीबाहेरच्या आणि अभिनयाला प्राधान्य असणाऱ्या भूमिकांची निवड शाहिदने केली. पण, त्याने 'कबीर सिंग'ची निवड कशी केली माहित आहे?
अभिनय कारकिर्दीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि कोट्यवधींची कमाई करणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचा प्रस्ताव शाहिदने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून स्वीकारला. शाहिदला त्याच्या या महत्त्वाच्या निर्णयात सल्ला दिला होता तो म्हणजे त्याच्या जीवनातील एका खास व्यक्तीने. ती व्यक्ती म्हणजे शाहिदची पत्नी मीरा राजपूत कपूर.
शाहिदनेच एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. मीरा आणि शाहिदने 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट एकत्र पाहिला होता. ज्यानंतर ही भूमिका दमदार असल्याचं सांगत तिने शाहिदला ती साकारण्याचा सल्ला दिला. 'चित्रपट खरंच चांगल्या पद्धतीने साकारण्यात आला तर, या भूमिकेत बरीच ताकद आहे', असंही तिने त्याला सांगितलं होतं.
मीराच्या या सल्ल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता शाहिदने हा चित्रपट स्वीकारला आणि पुन्हा एकदा एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचंही तितकंच महत्त्वाचं योगदान असतं हेच सिद्ध झालं. .