सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; थेट बांगलादेश कनेक्शन?

Saif Ali Khan Attacker Arrested: गुरुवारपासून मुंबई पोलिसांच्या 30 टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. अखेर मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 19, 2025, 06:56 AM IST
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; थेट बांगलादेश कनेक्शन? title=
शनिवारी रात्री उशीरा करण्यात आली अटक

Saif Ali Khan Attacker Arrested: अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे पश्चिममधून मुंबई पोलिसांनी विजय दास नावाच्या व्यक्तीला शनिवारी रात्री ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संक्षयितांचा प्रकरणाशी काही संबध नसल्याचं म्हटलं आहे. मुख्य आरोपी विजय दासला झोन 6 चे डिसीपी नवनाथ ढवळेंची टीम आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये ताब्यात घेतलं. कासारवडवलीमधील मेट्रोचं बांधकाम सुरु असलेल्या कामगार वसाहतीमधून विजय दासला पोलिसांनी अटक केली. ही वसाहत ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरजवळ आहे.

नेमकी कुठून करण्यात आली अटक?

"विजय दास यापूर्वी मुंबईतील पबमध्ये काम करायचा. त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे," अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. मुंबई पोलीस आज सकाळी 9 वाजता पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्रीनंतर प्राणघातक हल्ला झाल्याच्या काही तासांमध्येच सोशळ मीडियावर हल्लेखोर दिसत असलेले सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

सैफचं घर 12 व्या मजल्यावर असून याच इमारतीच्या फायर एक्झिटच्या जीन्यावर सहाव्या मजल्यावर हा चोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणामध्ये काही संक्षयितांना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने म्हणजेच आरपीएफने छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरुन एका संशयिताला अटक केली होती. मात्र आता या संक्षयितांचा प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सैफीची प्रकृती स्थीर

54 वर्षीय सैफवर राहत्या घरात चाकू हल्ला झाला तेव्हा घरी त्याची दोन्ही मुलं तैमूर, जेह यांच्यासहीत पत्नी करिनाही उपस्थित होती. गुरुवारी सैफवर दोन शस्रक्रीया करण्यात आल्या. सैफच्या पाठीमधून तुटलेल्या चाकूचा तुकडा काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सैफची प्रकृती स्थीर आहे. सैफला आठवडाभर आरामाची गरज असून त्याला चार ते पाच दिवस रुग्णालयात रहावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सैफला 21 जानेवारी किंवा त्यानंतरच डिस्चार्ज मिळेल असं सांगितलं जात आहे.

आरोपीचं बांगलादेश कनेक्शन?

आरोपीचं खरं नाव मोहम्मद अलन असं असून ज्याला बीजे नावानेही ओळखलं जातं. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकात आणलं. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आपण सैफच्या घरात घुसखोरी केलेली असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. हा आरोपी भारतीय आहे की बांगलादेशी याचाही शोध आता घेतला जात आहे. सदर आरोपीने बनावट भारतीय कागदपत्रं बनवून नवीन खोटी ओळख तयार केली आहे का या दिशेनंही शोध घेतला जाणार आहे.