मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह अलीकडेच बिग बॉस ओटीटीच्या घरात स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र शोमधून बेघर झाल्यानंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा कामावर परतली आहे. या दरम्यान, अक्षरा ने तिच्या मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य उघड केलं, जे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले. अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर अनेक गंभीर आरोप केले आणि यामुळे ती डिप्रेशनमध्ये कशी गेली हे सांगितलं.
मुलांनी अॅसिडची बाटली घेऊन पाठलाग केला
अक्षरा सिंहने सांगितलं की, ब्रेकअपनंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या कशा आल्या, एवढंच नाही तर काही मुलं तिचा मागे अॅसिडची बाटली घेऊन पाठलागही करायचे. यावर बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की, मुलं माझ्या मागे बाटल्या घेऊन घरी आली, अगदी रस्त्यावर ड्रग्ज घेणारे लोकही त्यावेळी माझ्या मागे येत असत. अभिनेत्री पुढे म्हणाली की, मी देवाकडे प्रार्थना करते की, अशी परिस्थिती कोणत्याही स्त्रीसोबत घडू नये किंवा कोणत्याही स्त्रीला याचा सामना करावा लागू नये.
करिअर झालं खराब
यासोबतच अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील लोकांवरही प्रश्नही उपस्थित केले. ती म्हणाली की, ''जेव्हा मी या गोष्टींना सामोरी जात होती, तेव्हा इंडस्ट्रीतील कोणीही माझ्या मदतीला पुढे आलं नाही. या उलट काही लोकं माझ्या विरोधात आले. तर काही लोकांनी मला जज केलं. एवढंच नाही तर अक्षरा म्हणाली की, संपूर्ण इंडस्ट्री माझ्या विरुद्ध उभी राहिली, माझ्याकडे कोणतंही काम नव्हते.
मी पूर्णपणे एकटी होते. अगदी मला कोणतंही कारण नसताना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव तिच्या मुलाखतीत उघड केलं नाही, मात्र तिचं आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा कायम हेडलाईन्स होत्या.