मुंबई : 'प्यार बिना चैन कहा रेsss....', हे गाणं बऱ्याच वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आजच्या घडीलासुद्धा या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. अशा या अफलातून आणि 'डिजे'च्या ठेक्यावर इतरांनाही नाचायला भाग पाडणाऱ्या गाण्याचा नवा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निमित्तं ठरत आहे, तो म्हणजे 'शुभ मंगल ज्यादा सावधान' Shubh Mangal Zyada Saavdhan हा चित्रपट.
बप्पी लहिरी यांच्या स्वरातील या नव्या गाण्यात त्यांना आयुष्यमानचीही साथ मिळाली आहे. शिवाय एकिकडे गाणं सुरु असतानाच दुसरीकडे पडद्यावर सुरु असणारी दृश्य या गाण्याला आणखी उठावदार ठरवत आहेत.
तनिष्क बागचीने रिक्रिएट केलेल्या या गाण्यामध्ये गजराज राव, नीना गुप्ता यांचा रेट्रो लूकही पाहायला मिळत आहे. त्याशिवाय जीतेंद्र कुमार आणि आयुष्मान खुरान यांचाही अपलातून अंदाज 'अरे प्यार कर ले' या गाण्यात पाहायला मिळत आहे. चमचमणारे कपडे, डिस्कोचा ठेका आणि त्यात रेट्रो लूकला चार चाँद लावणारं कलाकारांचं नृत्य याची सांगड या गाण्यात घातली गेली आहे. जे पाहताना आपोआपच चेहऱ्यावर हसू उमटतं.
हे 'युनिसेक्स गाणं' असल्याचं अगदी सुरुवातीलाच कानी पडतं. पुढे सुरुवातीला असं नेमकं का म्हटलं गेलं आहे, याचा अंदाजही येतो. गाण्याच्या अखेरच्या भागात खुद्द बप्पी लहिरीसुद्दा झळकत असल्यामुळे आयुष्यमान आणि जीतूच्या आगामी चित्रपटातील हे गाणं खऱ्या अर्थाने खास ठरत आहे.
समलैंगिक प्रेमसंबंधांसारख्या अतिशय संवेदनशील विषयावर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामध्ये आपल्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या एका अभिनेत्या सोबतची आयुष्मानची केमिस्ट्री प्रेक्षकांचं मन जिंकून गेली. अभिनेता आणि अभिनेत्रीच्याच जोडीची कला वर्तुळात चर्चा सुरु असते. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने मात्र दोन अभिनेत्यांचीच ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.