Buying a new home : नवं घर खरेदी करायचा मुद्दा जेव्हाजेव्हा चर्चेत येतो तेव्हातेव्हा सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक जुळवाजुळवीची. पैशांची व्यवस्था करत आपल्याला अपेक्षित असणारं घर शोधण्यासाठी मग धावपळ सुरू होते. पण, एका महिलेनं सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा अनुभव वाचता तिच्यासाठी या गोष्टी अधिक सोप्या असल्याचं लक्षात आलं. कारण, तिनं अवघ्या 85-90 रुपयांना एक घर विकत घेतलं आणि त्यानंतर या घराच्या इंटेरिअरसाठी तिनं कोट्यवधींचा खर्च केला.
शिकागोमधील आर्थिक सल्लागार Meredith Tabbone नावाच्या महिलेनं इटलीच्या Sambuca di Sicilia इथं एक घर खरेदी केलं होतं. घराची अवस्था न पाहताच हा व्यवहार अवघ्या $1.05 म्हणजेच साधारण 85-90 रुपयांमध्ये झाला. 2019 मध्ये इटलीमध्ये अशा कैक निर्मनुष्य घरांचा लिलाव करत विक्री करण्यात आली. Tabbone यांची पाळंमुळंही याच गावाशी जोडली गेल्यामुळं त्यांनी इथं 17 व्या शतकातील हे घर खरेदी केलं जिथं पाणी आणि वीजपुरवठाही नव्हता. जवळपास चार वर्षांनंतर जेव्हा त्यांनी या घराचं काम केलं जेव्हा हा कायापालट पाहून सारेच घाबरले.
इटलीमधील या घरासाठी त्यांनी $446,000 म्हणजेच Rs 3.8 कोटी इतका खर्च केला. या लिलावामध्ये सहभागी झाल्या क्षणापासून 44 वर्षीय Meredith Tabbone यांनी लिलावात ते जिंकेपर्यंत मोठी प्रतीक्षा केली. हे घर त्यांच्यासाठी अतिशय खास होतं, कारण इथंच त्यांचे पणजोबा वास्तव्यास होते. 1908 मध्ये अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाचं याच घरात वास्तव्य होतं.
Sambuca हे एक कमाल शहरवजा गाव असून, इथं असणाऱ्या अनेक घरांची विक्री एक डॉलरहून कमी दरातही करण्यात आली. या गावातील अनेक नागरिकांनी काळानुरूप शहरांची वाट धरली आणि पाहता हे गाव रिकामं होत गेलं. ज्यानंतर येथील घरांची लिलाव प्रक्रियेतून विक्री करण्यात आली.
फार कमी किमतीत खरेदी केलेल्या घरावर जवळपास तीन वर्षे काम केल्यानंतर आता त्याचं रुप इतकं बदलण्यात आलं की, हे घर आता आपण अजिबातच विकणार नसल्याचं या महिलेनं स्पष्ट केलं. घराचा हा कायापालट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि बऱ्याचजणांनी हे घर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण, Tabbone यांनी मात्र यास स्पष्ट नकार दिला. इटलीतील या टुमदार आणि समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या या गावातील आणखीही काही घरांची हीच कहाणी.