Why Xi Jinping Is Not Coming To India For G20 Summit: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे यंदाच्या आठवड्यामध्ये नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. यंदाच्या वर्षी भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जागतिक स्तरावरील परिषदेसाठी भारतात न येण्याचा क्षी जिनपिंग यांचा निर्णय सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा आहे. यापूर्वीच्या जवळजवळ सर्वच जी-20 बैठकींसाठी जिनपिंग यांनी हजेरी लावल्याचा रेकॉर्ड असताना आता अचानक त्यांनी या बैठकीसाठी न येण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र जिनपिंग का येणार नाहीत यामागील एक वेगळं कारण समोर आलं आहे. हे कारण क्षी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावणारं असल्याचं म्हटलं जात आहे.
एका वृत्तानुसार, क्षी जिनपिंग यांनी जी-20 परिषदेसाठीचा भारत दौरा टाळण्यामागे अंतर्गत राजकीय कारण असल्याची माहिती समोर येत आहे. 'निक्केई आशिया'ने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, या राजकीय घडामोडीचा संबंध बेइदैहे बैठकीशी आहे. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये झालेल्या या बैठकीशी जिनपिंग यांनी भारत दौरा रद्द केल्याशी संबंध जोडला जात आहे. हेबेई प्रांतामध्ये समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या बेइदैहे शहरामध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यमान आणि सेवानिवृत्त नेत्यांची वार्षिक बैठक होते.
सामान्यपणे बेइदैहे येथे दरवर्षी होणाऱ्या बैठकींमधील चर्चा, ठरलेली धोरणं ही लगेच जाहीर केली जात नाहीत. या बैठकीतील चर्चा सार्वजनिक केली जात नाही. मात्र यंदा बंद दाराआड झालेल्या चर्चेचे तपशील समोर आले आहेत. बेइदैहे येथे झालेल्या या बैठकीमध्ये 2012 पासून क्षी जिनपिंग महासचिव म्हणून सहभागी होतात. मात्र मागील 11 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या बैठकीमध्ये वातावरण फारच वेगळं होतं. 'निक्केई आशिया'मधील वृत्तानुसार यंदाच्या बैठकीमध्ये सेवानिवृत्त वरिष्ट नेत्यांच्या एका गटाने क्षी जिनपिंग यांना चांगलेच झापले. जिनपिंग यांच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांनी टाळलेल्या निर्णयांवरुनही सुनावलं. पक्षातील काही प्रमुख वरिष्ठ नेते या बैठकीत नव्हते. माजी राष्ट्रपती जियांग जेमिन यांचं नोव्हेंबर महिन्यामध्ये वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाल्याने पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय ही बैठक पार पडली. क्षी यांचे माजी सहकारी हू जिंताओ यांना पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसमधील ग्रेट हॉल ऑफ द पिपल्समधून डच्चू देण्यात आल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. मात्र ते या बैठकीला आळे नाहीत.
क्षी जिनपिंग यांच्याबरोबरच्या बैठकीला फार मोजके वरिष्ठ नेते उपस्थित होते. या नेत्यांनी क्षी जिनपिंग यांना थेट इसारा दिला. प्रभावी उपाययोजना केल्याशिवाय राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उलथापालथ झाल्यास पक्षाला मिळत असलेला पाठिंबा संपून जाईल. यामुळे पक्षाचं वर्चस्व धोक्यात येईल, असा स्पष्ट इशारा या वरिष्ठ नेत्यांनी क्षी जिनपिंग यांना दिला आहे. यामुळेच सध्या क्षी जिनपिंग हे पक्षांतर्गत घडामोडी आणि पक्षाची प्रशासनावरील पकड अधिक घट्ट करण्याला प्राधान्य देत आहेत. म्हणूनच त्यांचा सध्या देश सोडून बाहेर दौऱ्यावर जाण्याचा विचार नसल्याने त्यांनी भारत दौरा टाळला आहे. क्षी जिनपिंग भारतामध्ये येत नसले तरी चीनचं प्रतिनिधित्व चिनी पंतप्रधान ली कियांग करणार आहेत. 10 सप्टेंबरपासून नवी दिल्लीमध्ये जी-20 परिषदेला सुरुवात होत आहे.