Putin Assassination: "पुतिन 71 वा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीत, 'या' तारखेआधीच होईल हत्या"

पुतिन हे सध्या ७० वर्षांचे असून ते आजारी असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात, मात्र रशिया सरकाने ही वृत्त फेटाळली आहेत.

Updated: Jan 14, 2023, 03:19 PM IST
Putin Assassination: "पुतिन 71 वा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीत, 'या' तारखेआधीच होईल हत्या" title=
Vladimir Putin Assassination Attempt (Photo: AP Photo/Ivan Sekretarev)

Vladimir Putin Assassination Attempt: रशियामधील विरोधी पक्षाच्या एका नेत्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. ल्या पोनोमारेव यांनी पुतिन यांची यंदाच्या 7 ऑक्टोबरआधी हत्या होईल असा खळबळजनक दावा केला आहे. लिया पोनोमारेव (ilya ponomarev) यांनी पुतिन त्यांचा 71 वा वाढदिवस कोणत्याही परिस्थितीत साजरा करताना दिसणार नाहीत असंही म्हटलं आहे. पुतिन यांचा अडसर दूर करण्यासाठी कट रचला जात आहे असं सांगताना पोनोमारेव यांनी पुतिन यांच्या जवळचे लोकच त्यांच्या हत्येसाठी जबाबदार असतील असंही म्हटलं आहे.

पुतिन आजारी?

अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये या विधानसंदर्भातील वृत्तांकन करण्यात आलं आहे. या बातम्यांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार पुतिन यांना पार्किन्सन आणि कॅन्सरसारख्या व्याधी आहेत. त्यामुळे पुतिन कधीही कोमात जाऊ शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र रशियन सरकारने कायमच हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 

एकमेव खासदार ज्यांनी...

अमेरिकेतील 'न्यूझवीक' या मॅगझिनने दिलेल्या मुलाखतीमध्ये पोनोमारेव यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. पोनोमारेव हे रशियामधील सर्वात विश्वासार्ह आणि जबाबदार नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं. सन 2007 ते 2016 पर्यंत ते खासदार होते. त्यांनी अनेकदा उघडपणे पुतिन यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती. जेव्हा 2014 मध्ये युक्रेनमधील क्रीमियावर रशियाने ताबा मिळवला होता जेव्हा पोनोमारेव हे एकमेव असे खासदार होते ज्यांनी उघडपणे पुतिन यांच्या या निर्णयाचा विरोध केला होता.

युक्रेनमध्ये राहायला गेले

पुतिन यांनीही पोनोमारेव अजिबात आवडत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा पोनोमारेव यांना अटक करण्यात आली आहे. अनेक महिने पोनोमारेव यांनी तुरुंगात काढले आहेत. सन 2016 मध्ये ते रशिया सोडून युक्रेनमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथील नागरिकत्वही स्वीकारलं. एका मुलाखतीमध्ये पोनोमारेव यांनी युक्रेनमधील एकाही प्रांतावर रशियाचा ताबा नसल्याचं म्हटलं आहे. खर्किव्ह आणि कीव्हमध्ये रशियाचा दारुण पराभव झाल्याचा दावा पोनोमारेव यांनी केला आहे.

हे वर्ष रशिया, पुतिन यांच्यासाठी चांगलं नाही

मात्र एकीकडे पुतिन यांच्या मृत्यूबद्दल भाष्य करताना पोनोमारेव यांनी पुतिन यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांच्याविरोधात विजय मिळवणं जवळजवळ अशक्य असतं असंही म्हटलं आहे. 2022 साल हे पुतिन आणि रशियासाठी फारसं चांगलं ठरलं नाही असा दावा करताना त्यांनी पुतिन पुढील वाढदिवस साजरा करणार नाहीत असं म्हटलं आहे.