Turkey Earthquake : तुर्की ((Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंपाने मोठी जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. भूकंपात आतापर्यंत जवळपास 21 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ-मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून अजूनही काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीवर (Natural Calamities) मात करण्यासाठी तुर्कीत जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताकडूनही शक्य ती मदत केली जात आहे. या संकटसमयी भारताने तुर्की आणि सीरियात मदतीसाठी NDRF आणि सैन्याचं वैद्यकीय पथक (Medical Team) तिकडे पाठवलं आहे.
ऑपरेशन दोस्त
तुर्की आणि सीरियातील लोकांच्या मदतीसाठी भारतातर्फे ऑपरेशन दोस्त (Operation Dost) चालवलं जात आहे. याअंतर्गत बचाव पथकासह गरजेच्या वस्तू आणि वैद्यकीय सामान घेऊन भारताचं सहावं विमान तुर्कीत पोहोचलं आहे. याशिवाय डॉग स्कॉडही पाठवण्यात आलं आहे. भूकंपामुळे दूरदूरपर्यंत फक्त मातीचा ढिगारा दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जणं अडकले आहेत. डॉग स्कॉडच्या मदतीने NDRF जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं युद्धपातळीवर काम सुरु आहे.
सहा वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला
बचावकार्यादरम्यान NDRF जवानांना ढिगाऱ्या खालून एका सहा वर्षांच्या मुलीला जीवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. भारतीय गृहमंत्रलयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. गंजियतेप शहरात बचावकार्य सुरु असताना डॉग स्कॉडच्या मदतीने NDRF च्या जवानांनी या मुलीचे प्राण वाचवले. हा व्हिडिओ गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी एक कॅप्शनही लिहिला आहे. यात त्यांनी म्हटलं, आम्हाला एनडीआरएफवर गर्व आहे. तुर्कीमध्ये टीम आयएनडी-11 ने गंजयातोप शहारत एका सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफला जगातील अग्रगण्य बचाव पथक बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असं अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटलं आहे.
Standing with Türkiye in this natural calamity. India’s @NDRFHQ is carrying out rescue and relief operations at ground zero.
Team IND-11 successfully retrieved a 6 years old girl from Nurdagi, Gaziantep today. #OperationDost pic.twitter.com/Mf2ODywxEa
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) February 9, 2023
गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये भारत या नैसर्गिक आपत्तीत तुर्कीबरोबर उभा असल्याचं म्हटलं आहे. भारताची एनडीआरएफ टीम ग्राऊंड झिरोवर बचाव अभियान राबवत आहे, असं सागंत गृहमंत्रालयाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत एनडीआरएफचे जवान एका रजईत मुलीला उचलून घेतल्याचं दिसत आहे.
दरम्यान, तुर्कीत भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच दिवसरात्री काढाव्या लागत आहेत.