न्यूयॉर्क : न्यूयॉर्क दौ-यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची भेट घेतली. पण दोन्ही देशासमोर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर या भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही.
ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. त्यामुळे द्विपक्षीय समस्या किंवा संबंध याविषयी चर्चा झाली नाही, असं भारतीय परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. बांग्लदेशात गेल्या काही दिवसात ४ लाख १० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी आश्रय घेतला आहे. तर भारतातही सुमारे 40 हजार रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरित झाले आहेत.
म्यानमारमध्ये लष्कराकडून होणाऱ्या अत्याचारांमुळे रोहिंग्यांचं स्थलांतर होतं आहे. यापार्श्वभूमीवर स्वराज आणि शेख हसीना भेटीला महत्व होतं. पण प्रत्यक्षात रोहिंग्यांविषयी चर्चाच झाली नसल्याचं भारतानं म्हटलं आहे.