Man Lives In House Surrounded By Highway: सरकारी प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण हा एक फार गुंतागुंतींचा मात्र तितकाच महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र दरवळेस सरकारी अथवा सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण करताना वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतं. कधी योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार तर कधी इतर तांत्रिक अडचणींमुळे जमीन अधिग्रहणालाच ग्रहण लागतं. भारतासारख्या देशात जमीन अधिग्रहाणासारख्या विषयांमध्ये अडचणी आल्यास प्रकल्प रेंगाळतात. मात्र चीनमध्ये अशाप्रकारे जमीन अधिग्रहणाला विरोध करणाऱ्यांना डावलण्याची स्वत:ची वेगळी पद्धत आहे. असाच काहीसा प्रकार आता पुन्हा नव्याने समोर आला आहे.
हुआंग पिंग नावाच्या एका व्यक्तीने एक मोठा हायवे बांधण्यासाठी आपलं घर आणि घराची जमीन देण्यास नकार दिला. शांघाईजवळच्या जिंक्स शहरामध्ये हुआंग पिंग यांचं घर असून येथून नियोजित रस्त्यासाठी त्यांनी घर सरकारला देण्यास नकार दिल्याने सरकारने या घराच्या आजूबाजूला हायवे बांधल्याचं वृत्त 'द मेट्रो'ने दिलं आहे.
सरकारने या घराच्या मोबदल्यात देऊन केलेले पैसे स्वीकारण्यास आपला आक्षेप असल्याचं हुआंग यांचं म्हणणं आहे. सरकारने हुआंग यांना 2 कोटी रुपयांचा मोबदला देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र हुआंग यांनी घर देण्यास नकार दिला आणि त्यांनी या दुमजली घरात राहण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारनेही आडमुठी भूमिका घेत या व्यक्तीचं घर आहे तसं ठेऊन त्याच्या आजूबाजूला घर बांधलं. उलट आता घराच्या आजूबाजूला रस्त्याचं बांधकाम होत असल्याने हुआंग आणि त्यांच्या 11 वर्षाच्या नातवालाच घरात धूळ येऊ नये म्हणून बराच वेळ वस्तूंची देखभाल करण्यामध्ये जात आहे. घराच्या आजूबाजूला रस्त्याचं बांधकाम दिवसभर सुरु असतं तेव्हा हुआंग आणि त्यांचा नातू घरात नसतात. दर संध्याकाळी ते घरी येतात आणि त्यांचा बराच वेळ घरातील वस्तूंवर बसलेली धूळ साफ करण्यात जातो, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.
हा हायवे पूर्ण बांधून झाल्यानंतर त्यावरुन वर्दळ सुरु होईल तेव्हा गाड्यांच्या आवाजामुळे या घरात सुखाने, शांततेत राहता येणार नाही, असंही हुआंग यांनी म्हटलं आहे. "मी मागे जाऊन काही निर्णय बदलू शकत असतो तर मी सरकारने दिलेल्या अटी शर्थी मानून घर तोडायला परवानगी दिली असती. आता मला असं वाटतंय की मी मोठी संधी गमावली आहे," असा पश्चाताप हुआंग यांनी 'द मेट्रो'शी बोलताना व्यक्त केला आहे.
The stubborn old Chinese man who refused to sell his house for a government project now regrets his decision.
Huang Ping, from Hunan province, hoped for more money but lost everything. The government built a road around his house, leaving it in the middle of a busy street. Now,… pic.twitter.com/it0rYe2fhd
— (@IbraHasan_) January 25, 2025
हुआंग यांचं घर सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हायवेच्या मधोमध असलेल्या या घरात पाहचण्यासाठी रस्त्याच्याखाली एका मोठ्या पाईपमधून येण्या-जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात आला आहे. हुआंग यांच्या घरी येऊन अनेकजण सध्या फोटो काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हुआंग यांना या घराच्या मोबदल्यात केवळ 2 कोटी रुपये नाही तर अन्य दोन ठिकाणी जमिनी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं होतं. नंतर दोन ऐवजी तीन ठिकाणी जमीन देण्यास सरकार तयार झालेलं. मात्र काही अटी-शर्थी मान्य न झाल्याने हुआंग यांनी ही ऑफर नाकारली. आता हुआंग यांच्या घराच्या आजूबाजूला भर टाकून दोन्ही बाजूने दोन लेन बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या घराचा वरचा मजला आणि छप्पर आता या हायवेच्या लेनच्या लेव्हलला आलं आहे. सरकार आता हुआंग यांना आधीची ऑफर देण्यास तयार नसल्याने ते अडचणीत आलेत.