41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 30, 2023, 04:49 PM IST
41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम? title=
Indian origin couple along with their daughter found dead in america

Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेतील एका शहरात भारतीय वंशाच्या जोडप्याचा व त्यांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. तब्बल 41 कोटी इतकी किंमत असलेल्या घरांत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिकदृष्ट्या, घरगुती हिंसाचारासंबंधीत हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत होते, अशी माहिती समोर येतेय. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षांचे राकेश कमल आणि त्यांची पत्नी टीना व 18 वर्षांची मुलगी एरियाना यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या राहत्या घरात आढळले. बोस्टन शहराजवळच हे कुटुंब राहत होते. तिघांचे मृतदेह आढळलेल्या घराची किंमत जवळपास 50 लाख डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 41 कोटी इतकी आहे. इतकी संपत्ती असतानाही तिघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

टीना आणि तिचे पती एडुनोवा नावाच्या एका कंपनीचे मालत होते. मात्र ही कंपनी आता बंद पडली होती. 2016मध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये लगेचच ही कंपनी बंद पडली. तेव्हापासून हे कुटुंब आर्थिक संकटांचा सामना करत होते. टीना कमल या एडुनोवा कंपनीच्या सर्वेसर्वा असल्याचे समोर येत आहे. तसंच, त्यांनी हार्वड विश्वविद्यालयातून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कुटुंब अर्थिक गर्तेत सापडले होते. त्यातुनच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत होता. मात्र, स्थानिक पोलिसांना इतक्यात यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कमल यांच्या मृतदेहाशेजारीच अनेक बंदुका असल्याचे समोर आले. मात्र, कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी गोळी झाडून आत्महत्या केलीये की त्यांची हत्या करण्यात आलीये, हे मात्र सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत सविस्तर चौकशी व तपास करण्यात येत आहे. मृतदेहाची वैदयकीय चाचणी झाल्यानंतर त्याचे अहवाल आल्यानंतर याबाबत स्पष्ट सांगणे योग्य ठरेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एक दोन दिवसांपासून या कुटुंबातील कोणताच व्यक्ती फोनचा प्रतिसाद देत नव्हता. घरही आतून बंद होते. नातेवाईकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळं त्यांनी शेवटी पोलिसांसोबत संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असून कमल कुटुंबीयांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली? याचे गुढ अद्याप कायम आहे. पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत.