Uganda Crime News : युगांडामध्ये भारतीय बॅंकरची निर्घृण हत्या... मृत्यूनंतरही एके-47 मधून झाडल्या गोळ्या

Crime News : या हल्ल्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कंपालाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन भारतीय समाजाची भेट घेत सुरक्षेचे आवाहन केले आहे. दरम्यान, पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: May 16, 2023, 03:42 PM IST
Uganda Crime News : युगांडामध्ये भारतीय बॅंकरची निर्घृण हत्या... मृत्यूनंतरही एके-47 मधून झाडल्या गोळ्या title=

Crime News : आफ्रिका खंडातील युगांडामध्ये एका भारतीयाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. युगांडाची (Uganda News) राजधानी कंपालामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने असॉल्ट रायफलने 39 वर्षीय भारतीय बँकरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलीस हवालदाराने ज्या एके-47 रायफलने ( AK47) गोळीबार केला ती चोरीला गेली होती. 46 हजार रुपयांच्या वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले. बँकरसोबत (Indian banker) बाचाबाची झाल्यानंतर पोलीस हवालदाराने त्यांची निर्घृणपणे हत्या केली.

12 मे रोजी झाली निर्घृण हत्या

पोलीस कर्मचाऱ्याने 21 लाख शिलिंगच्या (46,000 रुपये)  कर्जासाठी झालेल्या वादातून भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. इव्हान वाबवायर नावाच्या या पोलीस कर्मचाऱ्याने 39 वर्षीय भारतीय बॅंकर उत्तम भंडारी यांची चोरीच्या एके-47 रायफलने गोळ्या झाडून हत्या केली. हत्येची वेळी आरोपी पोलीस कर्मचारी कामावर नव्हता. कंपाला मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, 30 वर्षीय इव्हान वाबवायरला 12 मे रोजी उत्तम भंडारी यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

कर्जाचा आकडा फुगवून सांगितल्याचा आरोप

उत्तम भंडारी यांच्या हत्येचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी इव्हान वाबवायर जवळून भंडारी यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करताना दिसत आहे. भंडारी हे टीएफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे (TFS) संचालक होते. इव्हान वाबवायर हा त्यांचा ग्राहक होता. इव्हान वाबवायरने कंपनीकडून घेतलेल्या पैशांबाबत दोघांमध्ये गैरसमज झाला होता. 12 मे रोजी वाबवायर यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेची माहिती मिळाल्यावर त्याने भंडारी यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भांडण सुरू केले. कर्जाचा आकडा भंडारी यांनी फुगवून सांगितला होता असा आरोप वाबवायने केला होता.

सहकाऱ्याचीच चोरली होती रायफल

कंपाला मेट्रोपॉलिटन पोलिसांचे प्रवक्ते पॅट्रिक ओन्यांगो यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर एके-47 रायफल तिथेच सोडून पळ काढला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून 13 गोळ्या जप्त केल्या आहेत. वाबवायरला मानसिक आजार होता आणि याच आजारपणामुळे तो दोनदा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या आजारपणामुळे त्याला शस्त्र बाळगण्यासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. वाबवायरने त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याकडून रायफल चोरली होती. या प्रकारानंतर वाबवायरला युगांडातील बुसिया पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, कंपालाचे पोलीस उपमहानिरीक्षक जेफ्री तुमुसिमे कात्सिगाझी यांनी या प्रकरणानंतर युगांडातील भारतीय समुदायाची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनीही सुरक्षा दलांकडून याबाबत उत्तर मागितले आहे.