Sachin and Seema Haider: पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे काही लोक सचिन आणि सीमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे सीमाचा पती गुलाम हैदर (Ghulam Haider) यालाही काही लोक पाठिंबा देत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पत्रकार मोहसीनने गुलाम हैदरची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्याने सीमाला पुन्हा परत येण्यासाठी आवाज दिला आहे.
गुलाम हैदरने म्हटलं आहे की, "तो सीमाशी अजूनही तितकंच प्रेम करतो. सीमाने मुलांसह पुन्हा परत यावं अशी माझी इच्छा आहे. जर सीमाला पाकिस्तानात सुरक्षित वाटत नसेल तर मी तिला माझ्यासह सौदी अरबला घेऊन जाईन. सीमा आणि मुलांसह सौदीतच मी स्थायिक होईन".
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सीमाची मुलं 'हिंदुस्तान जिंदाबाद' च्या घोषणा देत आहेत. या व्हिडीओवर गुलाम हैदरने म्हटलं आहे की, माझी मुलं फार लहान आहेत. त्यांना जर तुम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणायला सांगितलं तर ते तेदेखील म्हणतील. त्यांना 'हिंदुस्तान जिंदाबाद' बोलायला सांगितलं तर ते नकार देणार नाहीत.
गुलामने सीमा हैदरला मुलांच्या नावे आवाहन करताना म्हटलं आहे की, "प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडण होत असतं. पण यामुळे मुलांचं भविष्य खराब होत आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करतो याची तुला कल्पना आहे. तुला जर तिथे काही झालं तर मुलांचं काय होईल याचा विचार केला आहेस का? त्यांची जबाबदारी कोण घेणार? किमान मुलांसाठी तरी परत ये".
मी सीमासाठी माझ्या पहिल्या पत्नीला सोडलं. सीमाच्या सांगण्यावरुनच मी सौदीला गेलो, जेणेकरुन जास्त पैसे कमावू शकेन, कुटुंबाला चांगलं जीवन मिळेल असं गुलामने सांगितलं आहे. सुरुवातीला आपण सीमाला महिन्याला 40 ते 50 हजार पाठवत होतो. यानंतर 80 ते 90 हजार पाठवू लागलो, जेणेकरुन मुलांना चांगलं शिक्षण मिळेल असाही गुलामचा दावा आहे.
घरासाठीच गुलामने सीमाला 17 लाख रुपये दिले होते. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. पण सीमाला घर खरेदी करण्याची इच्छा होती. यामुळे त्याने उधारी घेत सीमाला पैसे पाठवले. गुलामने सांगितलं आहे की "जे व्हायचं ते झालं, आता तू परत ये. मी अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो आणि करत राहीन. मला आणि मुलांना तुझी फार आठवण येते. तुला कोणीही काही बोलणार नाही. मी तुला माझ्याजवळ ठेवेन. आयुष्याची नवी सुरुवात करुयात".
गुलामने यावेळी लोकांना तिच्यावर आरोप करत बदनामी करु नये असं आवाहनही केलं आहे. काही लोक सोशल मीडियावरुन सीमाची बदनामी करत आहेत. त्यांनी असं करु नये अशी माझी विनंती आहे. सीमा तशी अजिबात नाही. तिचं पहिलं लग्न माझ्याशीच झालं होतं. मी तिच्यासह राहिलो आहे. उगाच तिच्याबद्दल वाईट बोलू नका. आम्ही आधीच त्रासलो आहोत असं गुलामने म्हटलं आहे.