वरूण भसीनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : हात बघून भविष्य सांगणारे अनेक आहेत. काहींचा त्यावर विश्वास असतो तर काही जणांना नसतो. मात्र आता ब्लडप्रेशर तपासून तुमच्या आरोग्याचं भविष्य सांगणं शक्य होणार आहे. दिल्लीत राहणारे 52 वर्षांचे राजीव सिंह तंवर यांना काही वर्षांत त्यांना हायपरटेंशन आहे. त्यांना दर चार दिवसांनी ब्लडप्रेशर मोजावं लागतं. एवढी वर्ष ते एकाच हातावर BP मोजायचे. मात्र अलिकडेच त्यांनी दोन्ही हातांचं BP एकाच वेळी पाहिलं. त्यात १० पॉइंटपेक्षा जास्त फरक आढळला. ही धोक्याची घंटा आहे.
दोन्ही हातांच्या BPमध्ये १० पॉइंटची तफावत म्हणजे आर्टिलरी ब्लॉकेज असू शकतो. आगामी काळात छातीत दुखणं, हृदयविकार, स्ट्रोक यासारखे आजार उद्भवण्याचा धोका आहे. देशातील तब्बल 10 कोटी लोकांना याचा धोका असू शकतो, असं मानलं जातंय. त्यामुळे दोन्ही हातांचं ब्लडप्रेशर मोजणं ही सर्वात योग्य पद्धत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.
याबाबत अमेरिकेच्या मॅसेच्युसॅटस् हॉस्पिटलनं एक संशोधन केलंय. 2017मध्ये रुग्णालयानं 40 वर्षांवरील 3400 रुग्णांची तपासणी केली. या रुग्णांमध्ये सुरूवातीला हृदयविकाराचं एकही लक्षण नव्हतं. त्यांच्यापैकी १० टक्के रुग्णांमध्ये दोन्ही हातांच्या प्रेशरमध्ये 10 पेक्षा जास्त अंतर आढळलं. 10 पेक्षा जास्त अंतर असलेल्यांपैकी 38 टक्के रुग्णांमध्ये कालांतरानं हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोकची लक्षणं आढळून आली.
उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार हा एका दिवसात होणारा आजार नाही. याची लक्षणं फार आधीपासून दिसू लागतात. ही लक्षणं वेळीच ओळखली आणि त्यानुसार आपली जीवनशैली बदलली तर अधिक निरोगी आयुष्य जगणं शक्य आहे.