व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका दुकानातील खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे दुकानावर येणारे ग्राहक बुशेद्ध होऊ खाली पडले. चीनमध्ये ही घटना घडली आहे.
चीनच्या झेजियांग प्रांतात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका दुकान मालकाला शेजारच्या दुकानातील महिलेकडे जास्त ग्राहक येत असल्याने चिड आली होती. यामुळे दुकानदाराने असं काही करण्याचा निर्णय घेतला जेणेकरुन ग्राहक महिलेकडे येणं बंद होईल.
एके दिवशी ली नावाची एक व्यक्ती महिलेच्या दुकानात आली आणि रोल्ड मीट खाल्लं असता प्रकृती बिघडली. यानंतर लागोपाठ 9 लोकांना असाच अनुभव आला. त्यांना उलट्या झाल्या आणि अखेर बेशुद्ध पडले.
खाण्यात विष असल्याची शंका आल्याने ली याने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना खाण्यात सोडियन नायट्रेट आढळला. हे एक इंडस्ट्रियल केमिकल आहे, ज्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास, डोकेदुखी, उलटी आणि चक्कर येणं असे त्रास होतात. काही प्रकरणात तर मृत्यूही होतो. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही तपासण्यात आलं असता शेजारी दुकानदारानेच अन्नात विष मिसळलं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चीनमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता घोटाळे सामान्य आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, एका 35 वर्षीय महिलेला दक्षिण चिनी शहर ग्वांगझू येथील रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणार्या मानार्थ सूपमध्ये डिश वॉश वॉटर आणि डिटर्जंट मिसळल्याबद्दल अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात, पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील एका रेस्टॉरंटच्या मालकाने एका ग्राहकाला त्याच्या अन्नात उंदराचे डोके आढळल्याची तक्रार केल्यानंतर बंद केलं होतं.