Tesla Cars in India : टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर सस्पेंस आहे. मात्र मस्क टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Cars) भारतात आणण्यास उत्सुक आहेत. पण यासाठी मस्क यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा या अटी स्पष्ट केल्या आहेत. भारत सरकारदेखील टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांना उद्देशून धोरणात्मक चौकटीचा विचार करत आहे. मात्र मस्क यांनी टेस्लाचे चीनमध्ये उत्पादन केल्यास आणि ते भारतात विक्री केल्यास सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना टेस्लाने भारतात कार बनवल्या तर त्यांचे स्वागत आहे, असे गडकरी यांनी म्हटलं आहे.
टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर अनेक दिवसांपासून संभ्रम आहे. मात्र मस्क यांनी भारतात ही कार आणण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी टेस्लासाठी एलॉन मस्क यांना स्पष्ट संदेश दिला. टेस्लाने स्थानिक पातळीवर कार तयार करण्याचे काम केले तरच त्याचे भारतात स्वागत आहे, असे गडकरी यांनी म्हटलं आहे.
टेस्लाचे भारतात उत्पादन सुरू करण्याच्या योजनेबाबत आणि सवलतींसाठी कंपनीच्या मागणीबद्दल विचारले असता नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. "आम्ही टेस्लाचे भारतात स्वागत करतो. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि येथे सर्व प्रकारचे विक्रेते आहेत. जर टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन करते, तर त्यांना सवलती मिळतील. जर एलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील टेस्ला चीनमध्ये उत्पादन करून भारतात विक्री करू इच्छित असेल तर सवलत दिली जाणार नाही," अशी स्पष्ट भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली.
काही दिवसांपूर्वी मोदी सरकार टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांसाठी एक योजना बनवत असल्याची बातमी समोर आली होती. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केला जाण्याची शक्यता आहे.
टेस्लाची किंमत किती असू शकते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचीही भेट घेतली आहे. 500,000 युनिट्सची वार्षिक उत्पादन क्षमता असलेला कारखाना भारतात उभारण्याचा टेस्लाचा मानस आहे. टेस्लाच्या मॉडेल रेंजमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या वाहनांचा समावेश अपेक्षित आहे.