मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानचं आयपीएलमध्ये मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं. मुंबई मिरर या वृत्तपत्रानं याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी मुंबईकडून आयपीएल खेळलेल्या जहीर खानला २०१९ सालच्या मोसमात वेगळी जबाबदारी मिळू शकते. जहीर खान हा मुंबईच्या टीमचा बॉलिंग सल्लागार होईल, असं बोललं जातंय. मागच्या वर्षी ही जबाबदारी लसीथ मलिंगानं पार पाडली होती. मागच्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये मलिंगाला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नव्हतं. अखेर मलिंगानं मुंबईच्या टीमच्या बॉलिंग सल्लागाराची भूमिका बजावली.
यावर्षी होणाऱ्या लिलावामध्येही लसिथ मलिंगा सहभागी होणार आहे. जगभरामधल्या वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये मलिंगा सहभागी होतो. आशिया कपमध्येही लसिथ मलिंगा श्रीलंकेकडून खेळला होता. आयपीएलनंतर लगेचच इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये लयीत राहण्यासाठी मलिंगाला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं आहे.
जहीर खान जर मुंबई टीमचा बॉलिंग सल्लागार झाला तर आयपीएलमधला हा त्याचा पहिलाच प्रशिक्षणाचा अनुभव असेल. २०१८ सालच्या लिलावामध्ये मलिंगाप्रमाणेच जहीर खानवरही बोली लागली नव्हती. तर दुसरीकडे मलिंगाला लिलावात एखाद्या टीमनं विकत घेतलं तर आधीच्या वर्षी प्रशिक्षक आणि पुढच्या वर्षी खेळाडू असणारा मलिंगा आयपीएलमधला पहिला खेळाडू ठरेल.
२०१९ साली भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएल युएई किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिंगाची लिलावात बोली लागण्याची दाट शक्यता आहे. कोलकाता आणि चेन्नईच्या टीम एका आंतरराष्ट्रीय दिग्गज फास्ट बॉलरच्या शोधात आहे. त्यामुळे या दोन टीमनी मलिंगावर बोली लावली तर आश्चर्य वाटायला नको.