अंपायर, पीच क्युरेटर होण्यासाठी किती शिक्षण असावं, कशी मिळते ही नोकरी? पाहा कसं कराल या क्षेत्रात करिअर

World Cup 2023 : क्रिकेट... एक असा खेळ जो खऱ्या अर्थानं भारतीयांच्या मनात घर करून आहे. अशा या खेळात मोठं होण्याची संधी अनेकांनाच असते. 

सायली पाटील | Updated: Nov 20, 2023, 11:44 AM IST
अंपायर, पीच क्युरेटर होण्यासाठी किती शिक्षण असावं, कशी मिळते ही नोकरी? पाहा कसं कराल या क्षेत्रात करिअर  title=
World Cup ICC Courses qualification required for a job to become umpire latest news

ICC Academy Courses: क्रिकेट हा खेळ जरी साहेबांच्या देशातून जगापर्यंत पोहोचला असला तरीही या खेळाला भारतात खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला असं म्हणणं गैर ठरणार नाही. काळ पुढं गेला तसतसं या खेळाला मिळणारं महत्त्वंसुद्धा प्रचंड वाढलं आणि या खेळानं अनेकांनाच मोठं केलं. सानथोरांच्या आवडीचा का खेळ इतका महत्त्वाचा की, भारतीय संघाला मिळालेलं अपयश प्रत्येक नागरिकाच्या जिव्हारी लागतं. 

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियानं 6 गडी राखून पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाचा हा विजय भारतीयांमध्ये मात्र निराशेची लाट आणण्यास कारणीभूत ठरला. आपण तिथे असतो तर हे केलं असतं, ते केलं असतं असं आवेगात अनेकजण खूप काही बोलून गेले. इथं एक ओळ सातत्यानं ऐकायला मिळाली, 'मी अंपायर असतो ना... तर....'. खेळाडूंच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवत निर्णय देणारी ही अंपायर मंडळी असतात तरी कोण? तुम्हाला माहितीये? मुळात अंपायर व्हावं असं तुम्हालाही वाटतंय का? 

आयसीसीकडून मिळतेय अंपायर, स्कोरर आणि पीच क्युरेटर होण्याची संधी 

2021 मध्ये आयसीसीकडून एक 'ट्रेनिंग अँड एज्युकेशन प्रोग्राम' लाँच करण्यात आला. उत्तमोत्तम प्रशिक्षक, पंच अर्थात अंपायर, स्कोरर आणि क्युरेटर तयार करण्याकडे या उपक्रमाचा कल होता. आयसीसीनंहाच हेतू केंद्रस्थानी ठेवत काही शैक्षणिक उपक्रम राबवण्याता निर्णय घेतला. यामध्ये आपल्या वेळेनुसार हे कोर्स पूर्ण करता येतात. (ICC Academy Courses). या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अखेरीस एक चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये यश मिळाल्यानंतर परीक्षार्थी पुढील टप्प्यावर पोहोचू शकतो. 

आयसीसीकडून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाला 6 टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये गेम, सेफ्टी अँड इनक्लूजन, पार्टीसिपेंट्स, कोच, इफेक्टिव ट्रेनिंग सेशंस आणि गेम डे यांचा समावेश आहे. इथं प्रत्येक टप्प्यानंतर चाचणी होत असून, यामध्ये परीक्षार्थींना किमान 75 टक्के गुण असणं अपेक्षित आहे. या अभ्यासक्रमाला यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एक प्रमाणपत्रही दिलं जातं. 

आयसीसी कोचिंग कोर्स लेवल 1

आयसीसी कोचिंग कोर्स लेवल 1 हा आणखी एक कोर्स असून, यामध्ये प्राथमिक स्तरावर सहभागी झालेल्यांना या खेळातील काही तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात येतात. तीन विभागांमध्ये या कोर्स विभागण्यात आला असून, यामध्ये ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अध्ययन आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतरही आयसीसीकडून अधिकृ प्रमाणपत्र देण्यात येतं. 

आयसीसीच्या क्रियो क्रिकेट प्रोग्राम फॅसिलिटेटर ट्रेनिंग कोर्समध्ये पिच क्युरेटर होण्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात येतं. इथं त्यांना पीच, मेंटेनेन्स, रेनोवेशन, सॉईल, वॉटर, मॉइश्चरायजर, ड्रेनेज, रोलिंग इत्यादी गोष्टी शिकवण्यात येतात. 

हेसुद्धा वाचा : 'लोग भूल जाते हैं...' Final चं आमंत्रण न मिळण्याबाबत कपिल देव असं का म्हणाले? 

तुम्हीही आयसीसीच्या या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिता तर, edapp.com/icc या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या शैक्षणिक उपक्रमांसाठी तब्बल 90 देश सदस्य असून, त्यांच्यामार्फत यासाठी मान्यता दिली जाते. 9 भाषांमध्ये घेण्यात येणाऱ्या या कोर्ससाठी icc-cricket.com आणि icc-cricket.com/about/development/training-and-education वर सविस्तर माहिती मिळू शकते.