World Cup 2023 Pakistani Players Sick: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा सुरु असतानाच पाकिस्तानी संघाबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडूंना सातत्याने ताप येत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानच्या 15 पैकी 6 खेळाडू आतापर्यंत आजारी पडले असून आजारातून बाहेर झाले आहेत. मात्र या साऱ्याचं खापर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने अप्रत्यक्षपणे भारतावर फोडलं आहे. पाकिस्तानी संघाला पुरवण्यात येत असलेली सुरक्षा आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या मागणीप्रमाणे सुरक्षेची काळजी घेतली जात असली तरी चोराच्या उलट्या बोंबा म्हणावं त्याप्रमाणे हसन अलीने याच गोष्टींमुळे खेळाडू आजारी पडत असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेल बाहेर पडतानाही मोठ्या प्रमाणात सुरक्षा घेऊनच बाहेर पडावं लागतं असं हसन अली म्हणाला आहे. "आम्ही सहज (हॉटेल) बाहेर पडू शकत नाही. आम्हाला बाहेर जायचं असेल तर संपूर्ण सुरक्षारक्षकांची टीम घेऊन बाहेर पडावं लागतं," असं हसन अलीने म्हटलं आहे. मागील 7 वर्षांमध्ये पाकिस्तानी संघ पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. पाकिस्तानी संघातील 15 खेळाडूंपैकी केवळ 2 खेळाडूंनी यापूर्वी भारत दौरा केला असल्याने अनेकजण भारतातील परिस्थितीसाठी नवखेच आहेत.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजकीय वाद असल्याने दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीत. हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांनिमित्तच आमने-सामने येतात. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. इस्लामाबादकडून भारताने कडेकोट सुरक्षा पुरवली जाईल असं स्पष्ट करण्यात आल्यानंतरही सुरक्षेसंदर्भात कारण नसताना आक्षेप घेतला होता. अखेर भारताने दिलेल्या सुरक्षेच्या ऑफरवरच पाकिस्तानी संघ भारतात येण्यास तयार झाला. पाकिस्तानी संघ भारतात येण्याच्या केवळ 2 दिवस आधी भारताने खेळाडूंना व्हिसा दिला.
खेळाडू वारंवार आजारी पडण्यामागील कारणासंदर्भात बोलताना हसन अलीने आम्ही भारतात आल्यापासून हॉटेलच्या रुममध्येच कोंडून असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. हॉटेलच्या रुममध्ये कोंडून असल्यामुळेच आमच्यापैकी अनेकांना ताप येण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे असं हसन अलीने म्हटलं आहे. "इथे आम्हाला उत्तम पाहुणचार मिळत आहे. आमची छान काळजी घेतली जात आहे. मात्र आम्हाला बाहेर पडता येत नाही. सुरक्षेसंदर्भातील बाबी लक्षात घेता आम्हाला आमच्या रुममधून बाहेर पडण्याआधी सुरक्षारक्षकांना तसं कळवावं लागतं," असं हसन अलीने म्हटलं आहे. हसन अली हा 29 वर्षांचा असून त्याची पत्नी भारतीय आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपच्या निमित्ताने तो सासरी आला आहे असंही त्याचे चाहते म्हणत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी 15 पैकी 2 खेळाडू आजारी असल्याने 13 खेळाडूंचाच पर्याय उपलब्ध याकडेही हसन अलीने लक्ष वेधलं. "आमचे बरेचेस खेळाडू तापामधून पूर्णपणे बरे झाले. मात्र हॉटेलची रुम सोडून सहज बाहेर जाता येत नसल्याने तुम्हाला रुम सिकनेसचा त्रास होतो," असंही हसन अली म्हणाला. म्हणजेच त्याच त्याच खोलीत राहून कोंदट वातावरण आणि मानसिक दृष्ट्या फारच त्रास होतो असं हसन अलीला म्हणायचं आहे.
पाकिस्तानी संघातील अब्दुल्ला शफीक, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, अगाह सलमान बरोबरच राखीव खेळाडू असलेला मोहम्मद हॅरीस आणि झमान खान यांना तापाचा आणि सार्दीचा त्रास झाला. पाकिस्तानमधील चाहत्यांना व्हिजा नाकारण्यात आल्याने ते आपल्या संघाला समर्थन करण्यासाठी भारतात आलेले नाहीत.
"आमचे समर्थक वाढले आहेत. पाकिस्तानी पत्रकारांना गृहित धरलं तर 45 ते 47 पाकिस्तानी पाठीराखे आहेत. आम्हाला आमच्या चाहत्यांची फार उणीव भासते. मात्र ही गोष्ट आमच्या हातात नाही," असं हसन अलीने म्हटलं आहे.