Babar Azam On South Africa Beat Pakistan: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यामध्ये पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव झाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये भारतापेक्षाही सरस कामगिरी करत थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करत 46.4 ओव्हरमध्ये 270 धावा करुन 50 ओव्हरच्या आतच तंबूत परतला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 47.2 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 271 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. एडन मार्करामने समजूतदारपणे केलेली खेळी आणि केशव महाराजच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आयसीसीच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानला पराभूत करुन त्यांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता अधिक धूसर केली. या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सामन्याचे विश्लेषण केले.
'आम्ही विजयाच्या फार जवळ आलो होतो. पण शेवट आम्हाला हवा तसा झाला नाही. संपूर्ण संघ फारच निराश झाला आहे. आम्ही फार उत्तम पद्धतीने टक्कर दिली. फलंदाजी करताना आम्हाला 10 ते 15 धावा कमी पडल्या. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी चांगली टक्कर दिली. मात्र दुर्देवाने आम्हाला विजय मिळाला नाही. हा सारा खेळाचा भाग आहे. डीआरएस हा खेळाचाच भाग असून त्याचा निकाल आणच्या बाजूने आला असता तर सामन्याचा निकाल फिरला असता,' असं बाबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबद्दल म्हणाला. तसेच पुढे बोलताना बाबरने, "हा सामना जिंकून सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्याचा आमचा प्रयत्न होता. पण असं झालं नाही. आम्ही आमच्या उरलेल्या पुढील तिन्ही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आणि पाकिस्तानासाठी चांगला खेळ करु. यानंतर आम्ही कुठे असून हे तेव्हाचं तेव्हा पाहात येईल," असंही म्हटलं.
पॉइण्ट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका एकूण 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून 10 पॉइण्ट्ससहीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानच्या संघाला सलग चौथा पराभव झाल्याने 6 सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या नावावर केवळ 4 पॉइण्ट्स असून सेमीफायनलालला पोहचण्याच्या त्यांच्या इराद्याला मोठा धक्का या पराभवामुळे बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये भारतीय संघाची एका स्थानाने घसरण झाली असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध लखनऊच्या मैदानावर रविवारी होणार आहे. भारताला हा सामना जिंकून पुन्हा पहिल्या स्थानी झेप घेता येईल. भारताने हा सामना जिंकला तर त्यांचे 12 पॉइण्ट्स होती.