मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी सरफराज अहमदवर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे आता सरफराजने टीमच्या दुसऱ्या खेळाडूंना इशारा दिला आहे.
भारताकडून ८९ रननी पराभव झाल्यानंतर भावूक झालेला सरफराज पाकिस्तानी टीमला म्हणाला, 'वर्ल्ड कपमधल्या बाकीच्या मॅचमध्ये कामगिरी सुधारली नाही तर आणखी टीकेला सामोरं जायला तयार राहा. मी घरी जाईन असं कोणाला वाटत असेल तर तो मूर्ख आहे. जर काही वेडंवाकडं झालं तर फक्त मीच घरी जाणार नाही.' 'द न्यूजडॉट कॉम डॉट पीके'सोबत सरफराज बोलत होता.
'याआधी काय झालं ते विसरा आणि उरलेल्या मॅचेसची तयारी करा. जुनी कामगिरी विसरुन उरलेल्या ४ मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल,' असं वक्तव्य सरफराजने केलं आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ५ पैकी फक्त १ मॅच जिंकली आहे, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानच्या खात्यात ३ पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर पाकिस्तानला उरलेल्या चारही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. याचसोबत त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.