लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला असला तरी ही मॅच अत्यंत रोमहर्षक झाली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही भारताच्या इतर बॅट्समननी निराशा केल्यामुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर आता दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण या टेस्ट मॅचमध्ये भारत काही बदल करून मैदानात उतरु शकतो.
भारतीय मैदानात खोऱ्यानं रन काढणारा शिखर धवन परदेशात मात्र खराब कामगिरी करतोय. भारत आणि आशिया खंडामध्ये धवनची सरासरी १०० च्या जवळपास आहे तर आशिया खंडाच्या बाहेर धवनची सरासरी २५ एवढी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही धवनला संधी मिळाली होती. पण एका टेस्ट मॅचमध्ये त्याला फक्त १६ रन बनवता आल्या होत्या. २०१३ सालच्या दौऱ्यामध्येही धवननं १३,१५, २९ आणि १९ रनची खेळी केली होती. खराब कामगिरीबरोबरच धवननं स्लिपमध्येही कॅच सोडला. याचा फटका त्याला बसू शकतो.
शिखर धवनला दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये डच्चू दिला तर मुरली विजयबरोबर लोकेश राहुलला ओपनिंगला पाठवलं जाऊ शकतं. पहिल्या मॅचमध्ये राहुलला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं होतं. पण त्याला चमक दाखवता आली नाही.
दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली शिखर धवनऐवजी चेतेश्वर पुजाराला संधी देऊ शकतो. पहिल्या टेस्टमध्ये पुजाराला टीममध्ये न घेतल्याचा फटका भारताला बसला. गेल्या काही महिन्यांपासून पुजारा काऊंटी क्रिकेटमध्ये खेळतोय. त्याच्या या काऊंटी क्रिकेटचा फायदा भारत दुसऱ्या टेस्टमध्ये घेऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये दिनेश कार्तिक शून्य आणि २० रनवर आऊट झाला. एवढच नाही तर कार्तिकनं दोन कॅचही सोडले. त्यामुळे कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी द्यायचा निर्णय कोहली घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. ऋषभ पंतनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसंच इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंत नुकताच भारतीय ए टीमकडूनही खेळला आहे. अभ्यास मॅचमध्ये ऋषभ पंतनं अर्धशतक केलं होतं.